नाशकातील दांडिया, गरब्यात मराठी गाण्यांची धूम

नाशिक : नवरात्रोत्सवानिमित्त शहरात विविध सांस्कृतिक मंडळे, संस्था आणि महिला ग्रुप्सच्या वतीने गरबा रास दांडियाचे आयोजन केले असून, यंदा गरबा रास दांडियात मराठी गाण्यांसह रिमिक्स गाण्यांची धूम दिसून येत आहे. दांडिया, गरबामध्ये हिंदी, राजस्थानी व गुजराथी भाषेतील गाणी दरवर्षी वाजवली जातात. मात्र, यंदा मराठी गाण्यांना तरुणाईने पसंती दिल्याचे दिसून येत आहे. धर्मवीर चित्रपटातील ‘अष्टमी’, तमाशा लाईव्ह मधील ‘रंग लागला’, तू ही रे मधील ‘गुलाबाची कळी’, वंशवेलमधील ‘अंबे कृपा करी’, चंद्रमुखीमधील टायटल साँग, सख्या सजना ही नवी गाणी तसेच मी हाय कोळी, ठाकर वाडी, राधिका रे, चल गं पारू या पारंपरिक गाण्यांवर तरुणाई बेधुंद होऊन थिरकताना दिसून येत आहे.

यंदा निर्बंधमुक्त वातावरण नवरात्रोत्सव असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गरबा रास दांडीया या नृत्यप्रकाराची तरुणाईमध्ये लोकप्रियता आहे. त्यामुळे शहरात सर्वत्र गरबा रास दांडियांना तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शारदीय नवरात्र काळात विविध संस्था किंवा संयोजन संस्थांनी मोकळ्या पटांगणावर दांडिया नृत्याचे आयोजन केले आहे. शहरात दांडिया कार्यक्रमात गरबाचे विविध प्रकार जसे की, घूमर, भवाई, दांडीया रास, डिस्को गरबा नृत्य सादर करताना तरुण व तरुणी पारंपारिक पेहरावात दिसून येत आहेत. आयोजकांकडून महिलांना पैठणीसुद्धा दिली जात आहे. या धमाल दांडिया, गरबा डीजे नाईटचा उपस्थित मनसोक्तपणे नृत्यानंद लुटताना दिसून येत आहे. तालबद्ध आणि लयबद्ध नृत्य तसेच वैविध्यपूर्ण पारंपारिक पेहराव हे या कार्यक्रमाचे वैशिष्ठ्य ठरले आहे. दांडियामध्ये तरुणाईची मराठी गितांच्या रिमिक्सवर मनसोक्त थिरकताना दिसून येत आहे. महिलांचा लयबद्ध पदन्यास, गरबा आणि दांडियाचे अनोखे फ्युजन आणि जल्लोषपूर्ण वातावरणात, ‘आंबे मात की जय’ चा निनादणारा जयघोष अशा वातावरणात दांडिया- डीजे नाईट रंगत आहेत.