बीड : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद गेल्यानं पहिल्याच होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. या बैठकीत झालेल्या जोरदार वादावाद झाल्याचं समोर येत आहे. भल्याभल्यांना आपल्या शाब्दिक हल्ल्यांनी शांत बसायला लावणाऱ्या भाजपचे आमदार सुरेश धस यांना अजितदादांनी चांगलं झापलं आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून 2021 ते 2022 या काळात कुठलेही विकासकामे न करतात 73 कोटी रूपये लाटल्याचा मुद्दा सुरेश धस यांनी बैठकीत मांडला. यावेळी, ‘तुम्ही लई मागचे बोलू नका, तुम्हाला जे म्हणायचे आहे, त्याची लेखी तक्रार करा,’ असं सांगत अजितदादांनी सुरेश धस यांना सुनावत त्यांना फार वाव दिला नाही. बैठकीत प्रसारमाध्यमांना प्रवेश नव्हता. मात्र, बैठकीत अजितदादांनी सुरेश धस यांना सुनावल्याची चर्चा अधिकारी आणि लोकप्रतिनिधींमध्ये रंगली होती.
हेही वाचा : ‘डीपीडीसी’ बैठकीत मुंडेंसोबत बाचाबाची झाली? सुरेश धस म्हणाले, आमचे भांडण…
बीडमधील कामे दर्जेदार झाली पाहिजे…
बैठकीत अजितदादा पवार म्हणाले, “अधिकाऱ्यांनी कुणाच्याही दबावात काम करण्याची गरज नाही. पोलिसांच्या कामातही राजकीय हस्तक्षेप होणार नाही. बीड जिल्ह्यातील कामे दर्जेदार झाली पाहिजेत. तुम्हाला कोणतीही अडचण आली, तर तुम्ही थेट माझ्या कार्यालयाशी संपर्क करा.”
स्वतंत्र चौकशी करणार…
बैठकीनंतर सुरेश धस यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. “बोगस पैसे उचलण्याचा मुद्दा उपस्थित केल्यावर अजितदादांनी सांगितलं, ‘संबंधित प्रकरणाचे लेखी पत्र द्यावे.’ मी संपूर्ण लेखी पत्र तयार केले आहे. बीड जिल्ह्या नियोजन समितीच्या निधीतून कुठलेही काम न करता 73 कोटी बोगस उचलण्यात आले आहे. याची लेखी तक्रार मी केली नव्हती. आता मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे लेखी तक्रार करणार आहे. 73 कोटी बोगस उचलल्याप्रकरणी स्वतंत्र चौकशी केली जाईल,” अशी माहिती धस यांनी दिली.
“मी अजितदादांचे पीए डिसलेंना पेनड्राईव्ह दिला आहे. नुसता पेनड्राईव्ह देऊन उपयोग नाही. याची लेखी तक्रार दिली जाईल. राज्याचे सचिव किंवा उपसचिव पदाचा एखादा अधिकारी चौकशी करण्यासाठी नेमला जाईल. पाच कोटी रूपये दोनदा उचलले आहेत, हे सरकारने मान्य केले आहे. एकूण 78 कोटी रूपयांचा घोटाळा झाला आहे. मी हा घोटाळा समोर आणल्यापासून जवळपास 500 लोक कोमा गेले आहेत,” अशी टिप्पणी धस यांनी केली. यानंतर एकच हशा पिकला.
हेही वाचा : 20 वर्षांत किती पैसा गोळा केला? मोदी सरकारच्या काळातील आकडा किती? ‘ईडी’नं दिला सगळा हिशेब