संभाजीनगरमध्ये एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संभाजीनगर पश्चिम मतदारसंघात पैसे वाटप होत असल्याचा व्हिडिओ विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्विट केला आहे. पैसे वाटप करणारे संजय शिरसाट यांना मतदान करण्याचं आवाहन करत आहेत. एका मतासाठी पाचशे रूपयांचा दर ठरविण्यात आल्याचं व्हिडिओत दिसत आहे.
संभाजीनगर पश्चिम मतदारसंघात शिवसेनेचे ( शिंदे गट ) आमदार, उमेदवार संजय शिरसाट विरुद्ध शिवसेनेचे ( ठाकरे गट ) राजू शिंदे यांच्यात थेट लढत होत आहे. मात्र, संभाजीनगर पश्चिम येथे पोलिसांच्या देखरेखीखाली पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. पैसे वाटपाचा व्हिडिओ दानवेंनी ट्विट केला आहे.
व्हिडिओत काय?
व्हिडिओत काहीजण व्यक्ती बसलेल्या दिसत आहेत. यातील एक व्यक्ती धनुष्यबाणाचं म्हणजे संजय शिरसाट यांची निवडून आल्यावर तुमचा पाण्याचा प्रश्न मिटवणार, असं आश्वासन देत आहे. तर, दुसरा व्यक्ती, ‘तुमची किती मते आहेत,’ असा प्रश्न विचारतो. तर, समोरून 8 मते, असं सांगता. त्यावर, ‘हे घे 4 हजार रूपये,’ असं म्हणत खिशातून पैसे काढून देतो. तसेच, ‘धनुष्यबाणाला मतदान करा,’ असं आवाहन करतो.
या ट्विटवर अंबादास दानवे यांनी लिहिलं की, “यापेक्षा निवडणूक आयोगाला मोठा पुरावा कोणता हवा आहे! देवळाई तांडा भागातील हा प्रताप आहे. कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?”
आता यापेक्षा मोठा पुरावा @ECISVEEP आणि @CEO_Maharashtra ला कोणता हवा! देवळाई तांडा भागातील हा प्रताप आहे. कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका? #MaharashtraElection2024 pic.twitter.com/qGnkbpSNt1
— Ambadas Danve (@iambadasdanve) November 19, 2024
पत्रकारांशी संवाद साधताना अंबादास दानवे म्हणाले, “पोलीस यंत्रणेच्या देखरेखेखाली पैसे वाटपाचं काम सुरू आहे. मग निपक्षपणे निवडणूक कशी होईल? संभाजीनगरचे पोलीस निपक्ष आहेत का? संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघात हा सर्व प्रकार सुरू आहे. निवडणूक आयोग याची दखल घेणार का?”
“प्रत्येक मतासाठी हजार ते दोन हजार रूपये देण्याचा प्रकार सुरू आहे. दहा ते वीस प्रभागात एक ते दोन हजार रूपये आधार कार्ड जमा झाले आहेत. हजार मतदारांना प्रत्येकी दोन हजार रूपयांप्रमाणे पैसे वाटण्यात आले आहेत,” असा आरोप अंबादास दानवे यांनी केला.