बीड – संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्याविरोधात फास आवळला जात आहे. तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी दबाव वाढवला आहे. मात्र नैतिकदृष्ट्या मी दोषी नाही, असे सांगत धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे. ते सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. तर बीडमध्ये भारतीय जनता पक्षाचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या पालकमंत्रीपदाच्या कार्यकाळात परळी आणि आंबेजोगाई येथे एक रुपयाचेही काम न करता सार्वजनिक बांधकाम विभागातून 73 कोटी 36 लाख रुपयांची बोगस बिलं उचलण्यात आल्याचा आरोप केला आहे.
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या (30 जानेवारी) जिल्हा नियोजन बैठकीसाठी येत आहेत. पालकमंत्री म्हणून त्यांचा पहिलाच बीड जिल्हा दौरा आहे. तर अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. आमदार सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेत सार्वजनिक बांधकाम विभागातील 73 कोटींच्या घोटाळ्याचा बॉम्ब फोडला. ते म्हणाले की, अजित पवार हे उद्या जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत, यावेळी त्यांच्यासमोर 2021 ते 2023 या धनंजय मुंडे यांच्या पालकमंत्रीपदाच्या कार्यकाळातील बोगस बीलांचा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे आमदार धस म्हणाले. या काळात महाविकास आघाडीचे सरकार होते आणि अजित पवार हेच उपमुख्यमंत्री होते. तेव्हा तत्कालिन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात उचलण्यात आलेल्या या बोगस बिलांची चौकशी ते जिल्हा स्तरावर करतात की, उच्चस्तरीय चौकशी नेमतात हे पाहावे लागेल, असेही ते म्हणाले.
बीड जिल्ह्याचा बाप…
संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. पोलिस अधिकाऱ्यासोबत बोलताना तो मी बीड जिल्ह्याचा बाप असल्याचे म्हणतो, यावर निशाणा साधताना आमदार धस म्हणाले की, धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भाड्याने दिले होते. बीड जिल्ह्याचा मीच बाप म्हणणारे हे लोक आहेत.
आमदर सुरेश धस म्हणाले की, संजय मुंडे नावाच्या अधिकाऱ्याने ही बिलं मंजूर केली आहेत. यानंतर हा अधिकारी कुठे आहे कोणाला माहित नाही.
अजित पवार माझ्यापेक्षा ज्येष्ठ, ते सातवेळा उपमुख्यमंत्री…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आमदार सुरेश धस यांच्यासंबंधीचा प्रश्न मुंबईत पत्रकारांनी विचारला होता. त्यावर संतप्त होत ते म्हणाले होते की, मी खालच्या लोकांच्या आरोपांवर बोलत नाही. माझा भाजपच्या नेत्यांशी संपर्क आहे. अमित शहा, जेपी नड्डा, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत मी बोलत असतो. खालचे लोक काय म्हणतात याच्याशी मला देणंघेणं नाही. यावर आमदार सुरेश धस म्हणाले की, अजित पवार काहीही बोलू शकतात. ते सातवेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत. ते माझ्यापेक्षा वयानेही ज्येष्ठ आहेत, त्यामुळे ते मला आरे-तुरे करु शकतात. मात्र त्यांनी 73 कोटींच प्रेम कोणावर करु नये, असे म्हणत आमदार धस यांनी टोला लगावला.
काय आहेत आमदार सुरेश धसांचे आरोप ?
आमदार सुरेश धसांचा आरोप आहे की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री होते. मुंडेंच्या पालकमंत्री पदाच्या 2021 – 2022 या कार्यकाळात परळी आणि अंबाजोगाई या दोन तालुक्यांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून कोट्यवधींची बोगस बीलं उचलण्यात आली. यापैकी किती रस्ते झाले, याचा शोध घेण्याची मागणी त्यांनी केली. तसेच बीडचे पालकमंत्री अजित पवार हे उद्या बीड जिल्हा दौऱ्यावर येत आहे, तेव्हा त्यांनी ही बोगस बिलं वसूल करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
1) 30-12-2021 रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभाग अंबाजोगाई 2 कोटी 31 लाख रुपयांचे बील उचलले.
2) 18 मार्च 2022 रोजी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग बीड 10 कोटी 98 लाख रुपयांचे बील उचलले.
3) 25 मार्च 2022 कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अंबेजोगाई 6 कोटी 59 लाख रुपयांचे बील उचलले.
4) 26 मार्च 2022 कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद क्रमांक -2 16 कोटी 48 लाख रुपयांचे बील उचलले.
5) 31 मार्च 2022 कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद बीड, 1 कोटी 34 लाख रुपयांचे बील उचलले.