छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेकडून खासदारकीची तर भाजपकडून राज्यपालकपदाची ऑफर होती, असा गौप्यस्फोट ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. परंतु, मला बाळासाहेब ठाकरे यांनी खूप काही दिले आहे. मी उद्धव ठाकरे यांना सोडणार नाही, असं खैरे यांनी स्पष्ट केले आहे.
विधानसभेनंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यापूर्वी सत्ताधारी पक्षांकडून विरोधी पक्षातील नेत्यांची फोडा-फोडी करण्यात येत आहे. शिंदे गटाकडून ऑपरेशन ‘धनुष्यबाण’ आणि ‘टायगर’ राबवण्यात येत असून ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते आणि पदाधिकारी फोडले जात आहेत. यावर बोलताना चंद्रकांत खैरेंनी गौप्यस्फोट केला आहे.
हेही वाचा : फरार असताना वाल्मिक कराडने ‘ते’ महत्त्वाचं काम केले; दानवेंचा मोठा दावा
“आमचे शिवसैनिक कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाहीत. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक आम्ही जिंकू,” असा विश्वास खैरेंनी व्यक्त केला.
“मी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात काम करतोय; करत राहीन. जरी माझ्याविरोधात काड्या करणारे लोक तिथे पोहोचले असले, तरी मी काम करत असतो. माझा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वावर विश्वास आहे. त्यांचाही माझ्यावर विश्वास आहे. मी अनेक वर्षापासून एकनिष्ठ आहे,” असं खैरेंनी म्हटलं आहे.
“लोकसभा निवडणुकीआधी उमेदवार मिळत नव्हता, तेव्हा संजय शिरसाट यांनी काही लोकांना माझ्याकडे पाठवले होते. शिंदेंच्या शिवसेनेत त्यांना घेऊन या, असं सांगितलं होते. भाजपचे लोक माझ्याकडे खूप वेळा येऊन गेले. माझा संपर्क अनेक वर्ष दिल्लीत होता. मला दिल्लीतून अनेक मान्यवरांची ऑफर होती. तुम्ही आमच्याकडे या, तुम्हाला खासदार मंत्री करतो. अलीकडे मला हरीभाऊ बागडेंसारखे राज्यपाल करण्याचीही ऑफर देण्यात आली होती,” असा दावा खैरंनी केला आहे.
“मी जिथे आहे, तिथे खूश आहे. मी राज्यपाल म्हणून का जाऊ? माझ्याकडे शिवसैनिक म्हणून सगळ्यात मोठे पद आहे. मला बाळासाहेब ठाकरेंनी खूप काही दिले आहे. भलेही मला काही मिळाले नाही, तरी चालेल; मी उद्धव ठाकरेंना सोडणार नाही, असा शब्द मी बाळासाहेब ठाकरे यांना दिला होता,” असंही खैरेंनी सांगितलं आहे.
हेही वाचा : खळबळजनक! मुलीवर अत्याचार करून मारून टाक; विद्यार्थ्यानं दिली 100 रूपयांची सुपारी