छत्रपती संभाजीनगर : सरकारी अधिकाऱ्याचे लाच मागितली म्हणून 2 लाख रूपये कार्यालयाबाहेर उडविणारे, मराठा आरक्षणासाठी आपली नवी कोरी कार जाळणारे फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा गावचे सरपंच मंगेश साबळे हे पुन्हा चर्चेत आले आहेत. मंगेश साबळे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर डोक्यावर कळशी घेत साडी घालून आंदोलन केले आहे. लाडक्या बहिणींना जल जीवन मिशनच्या माध्यमातून चार-चार वर्षे झाले पाणी पिण्यासाठी मिळत नाही, असं म्हणत मंगेश साबळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल विचारला आहे.
गावकऱ्यांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. 4 वर्षापासून जल जीवन मिशनचे काम अपूर्ण आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी मंगेश साबळे यांनी साडी घालून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले. याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
हेही वाचा : पटोलेंना काँग्रेसचा दणका, नानांच्या आणखी एका निर्णयाला स्थगिती; नेमकं प्रकरण काय?
मंगेश साबळे म्हणाले, “माझ्या गावातील महिलांना 2 किलोमीटर पाण्यासाठी पायपीट करावी लागते. 2020-21 काळात जल जीवन मिशन अंतर्गत 1 कोटी 80 लाख मंजूर करण्यात आले. मात्र, पाईपलाईन टाकूनही 4 वर्ष झाली, तर पाणीपुरवठा सुरू झाला नाही. त्या पाईप गंजून जात आहेत.”
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाडकी बहीण म्हणतात. परंतु, लाडक्या बहिणींनी जल जीवन मिशन अंतर्गत अजून पिण्यासाठी पाणी मिळत नाही. अधिकारी काम करत नाही. यात काही भ्रष्टाचार झाला का? असे वाटत आहे. कंत्राटदाराने काम पूर्ण केले नाही. कंत्राटदाराला काम पूर्ण करायचे नव्हते, तर घेतले कशाला? 2020 मध्ये जल जीवन मिशन योजनेचे माझ्या गावात उद्घाटन करण्यात आले. पाच वर्षे झाली, पाणी आले नाही. माझ्या गावात जाण्यासाठी मला नाक राहिले नाही. लाडक्या बहिणींना पाणी पाजायची जबाबदारी मुख्यमंत्री फडणवीस यांची आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तातडीने बैठक बोलवावी. अजून उन्हाळा सुरू झाला नाही. उन्हाळा सुरू झाल्यावर पिण्यासाठी पाणी मिळणार नाही. अशी परिस्थिती आमच्यावर आली, तर उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा मंगेश साबळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांना दिला आहे.
कोण आहेत मंगेश साबळे?
मंगेश साबळे फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा गावचे सरपंच मंगेश साबळे आहेत. अधिकाऱ्याने काम करण्यासाठी टक्केवारी मागितली म्हणून सरकारी कार्यालसमोर मंगशे साबळे यांनी दोन लाख रूपये उधळले होते. तसेच, मराठा आरक्षणासाठी मंगेश साबळे यांनी स्वत:ची नवी कोरी कार जाळली होती. त्यासह जालना लोकसभा मतदारसंघातून मंगेश साबळे यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत मंगेश साबळे यांचा पराभव झाला होता. तरी, त्यांना 1 लाख 55 हजार मते मिळाली होती.
हेही वाचा : मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर राहुल गांधींची तिखट प्रतिक्रिया; म्हणाले, बंदुकीची गोळी लागलेल्या जखमांवर…