परळी (बीड) – राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी आज संपूर्ण 288 मतदारसंघात मतदान सुरु आहे. राज्यात अनेक ठिकाणी शांततेत मतदान सुरु आहे, मात्र काही ठिकाणी गोंधळ आणि राडा झालेला पाहायला मिळत आहे. तर सर्वच मतदारसंघात सकाळपासूनच मतदारांनी गर्दी केल्याचे चित्र आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या प्रमुख दोन आघाड्यांमध्ये लढत होत आहे. अशातच, परळी विधानसभा मतदारसंघांमध्ये बोगस मतदान होत असल्याची तक्रार शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केली आहे. याच दरम्यान परळी शहरातील बँक कॉलनी परिसरामध्ये असलेल्या मतदान केंद्रावर उमेदवार मतदान केंद्रातील माहिती घेत असताना वकील माधव जाधव यांना तीन ते चार जणांनी मारहाण केली आहे. असा एक व्हिडिओ सध्या पुढे आल्याचे बघायला मिळत आहे. मतदान केंद्राबाहेर उभे असताना माधव जाधव यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आहेत. दरम्यान या प्रकरणामुळे परळी विधानसभा मतदारसंघांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
घाटनांदूरमध्ये मतदान केंद्राची तोडफोड
राष्ट्रवादीचे नेते माधव जाधव यांना परळी मध्ये मारहाण झाल्यानंतर त्याचे पडसाद परळी विधानसभा मतदारसंघातील घाटनांदुर या ठिकाणी उमटले. घटनांदूर मधील मतदान केंद्रामध्ये मतदान चालू असतानाच काही कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रात घुसून मतदान केंद्रावर हल्ला केल्याची घटना घडली आहे काही काळ यामुळे या ठिकाणचे मतदान थांबवण्यात आले. दरम्यान दुपारी तीन पर्यंत परळीमध्ये 52.41 टक्के मतदान झाले.
बीड जिल्हाधिकारी धनंजय मुंडेंच्या शेतातला गडी
परळी मतदारसंघात पैशांचा पाऊस धनंजय मुंडे यांच्याकडून पाडला जात आहे. रात्रभर पैसे वाटप सुरु होते. पाच हजाराला एक मत असा भाव त्यांनी लावला होता. आज अनेक मतदान केंद्रामध्ये सीसीटीव्ही बंद करुन टाकण्यात आले. सीआरपीएफचे जवान तैनात नाही. मोठ्या प्रमाणात बोगस मतदान सुरु आहे. मतदारांना बाजूला करुन पोलिंग एजंट स्वतः बटन दाबत आहेत, असे गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केले. बीड जिल्ह्याधिकाऱ्यांना या संबंधीची तक्रार केली, मात्र त्यांच्याकडून कुठे कारवाई केली जात नाही. ते जिल्हाधिकारी नसून मुंडेंच्या शेतातले गडी असल्यासारखे काम करत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांपासून गैरप्रकार करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना सस्पेंड करण्याची मागणी राजेसाहेब देशमुख यांनी केली.
उमेदवारांना पोलीस संरक्षण द्या – धनंजय मुंडे
राज्यात विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरु असून, त्या अनुषंगाने परळी विधानसभेचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी परळीतील सर्व प्रमुख उमेदवारांना पोलीस संरक्षण आणि शासकीय कॅमेरा सर्व्हेलन्स देण्यात यावे, अशी मागणी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.
दरम्यान शरद पवार गटाकडून बीड आणि परळीतील घटनांवर चिंता व्यक्त केली आहे. मतदान केंद्राची तोडफोड करण्यात आलेल्या घटनेचा निषेध केला आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील परळी विधानसभा मतदारसंघात संविधान विरोधी घटकांनी ईव्हीएम मशीनची तोडफोड केली आणि निवडणूक प्रक्रियेला गालबोट लागले अशा घटनांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष जाहीर निषेध करतो..! pic.twitter.com/wmV1vAY7be
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) November 20, 2024
Edited by – Unmesh Khandale