Homeमहाराष्ट्रमराठवाडाManoj jarange : 'मुंडेंची पार्श्वभूमी गुन्हेगारी नाही', नामदेव शास्त्रींच्या विधानावर जरांगे-पाटील म्हणाले....

Manoj jarange : ‘मुंडेंची पार्श्वभूमी गुन्हेगारी नाही’, नामदेव शास्त्रींच्या विधानावर जरांगे-पाटील म्हणाले….

Subscribe

छत्रपती संभाजीनगर : सरपंच संतोष देशमुख आणि खंडणी प्रकरणात अटकेत असलेले वाल्मिक कराडच्या अटकेमुळे अडचणीत आलेले मंत्री धनंजय मुंडे भगवानगडावर महंत नामदेव शास्त्री महाराज यांच्याशी चर्चा केली. मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच भगवानगड त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे, असं महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी म्हटले आहे. यानंतर मराठा नेते, मनोज जरांगे-पाटील यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

जरांगे-पाटील यांनी गुरूवारी उपोषण स्थगिती केले आहे. यानंतर जरांगे-पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तेव्हा ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

हेही वाचा : बैठकीत गरमागरमी! ‘लई मागचे बोलू नका, तुम्हाला….’, अजितदादांनी धस यांना सुनावले

जरांगे-पाटील म्हणाले, “महाराज, महंत यांच्याबद्दल बोलू नये. राजकारणी लोक डागाळलेली असतात. संत, महंत म्हणजे संस्कार देणारे, पिढी घडवणारे न्यायमंदिर असते. महंतांना दोष देऊन उपयोग नाही. भेट घेणाऱ्यांनी त्यांना बोलायला शिकवले असेल. खून, चोऱ्या, खंडणीबद्दल महंत बोलतील, असे वाटत नाही.”

“मराठा, वंजारी, ओबीसी, धनगर किंवा कोणताही समाज असो; इतके विकृतपणाने केलेल्या कार्याला कुठलाही समाज पाठीशी घालत नाही. धनंजय मुंडे यांची टोळी यातून सोडून द्या. वंजारी समाजालाही अशा गोष्टी मान्य नाहीत,” असं जरांगे-पाटील यांनी सांगितलं.

धनंजय मुंडेंच्या दबावाखाली महंत आहे का? असा प्रश्न विचारल्यावर जरांगे-पाटील यांनी म्हटलं, “महंत खूप खमक्या आहेत. ते स्पष्ट बोलतात. ते कुणालाही भीत नाहीत.”

‘धनंजय मुंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही,’ असं महंत शास्त्री महाराज यांनी म्हटले आहे. याबद्दल विचारल्यावर जरांगे-पाटील म्हणाले, “असे महंत म्हणत असतील, तर वाईट आहे. बोलण्याच्या ओघात महंत बोलून गेले असतील, तर दुरूस्त करतील. कारण, घटना लहान नाही आहेत. एक बाजूला सांगितल्यावर महंतांना पटले असेल. परंतु, महंत विधान दुरूस्त करतील.”

नामदेव शास्त्री महाराज काय म्हणाले?

“धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भगवानगड भक्कमपणे उभा आहे. त्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. धनंजय मुंडे हा खंडणी घेऊन जगणारा मुलगा नाही. धनंजय मुंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. या सर्वांचा समाजावर भयंकर परिणाम झाला आहे. ज्या व्यक्तीला जातीवाद माहिती नाही, त्यालाही तो माहिती झाला. त्यामुळे कायमस्वरुपी सामाजिक सलोखा बिघडला,” अशी खंत नामदेव शास्त्री महाराज यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : ‘डीपीडीसी’ बैठकीत मुंडेंसोबत बाचाबाची झाली? सुरेश धस म्हणाले, आमचे भांडण…