जालना : हे आंदोलन आपण स्थगित करत आहोत. यापुढे उपोषण होणार नाही. आता समोरा-समोर लढायची तयारी ठेवायची, असा इशारा मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिला आहे. यावेळी भाजपचे आमदार, सुरेश धस, राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) खासदार बजरंग सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रसचे ( अजितदादा पवार ) आमदार प्रकाश सोळंके, जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ हे उपस्थित होते. यावेळी जरांगे-पाटील यांनी आपल्या मागण्या मांडल्या आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांचा वेळ दिला आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास मुंबईत जाणार, असेही जरांगे-पाटील ठणकावून सांगितलं आहे.
जरांगे-पाटील म्हणाले, “नोंदी शोधणारी शिंदे समिती लगेच सुरू करा. शिंदे समितीने काम करताना अधिकाऱ्यांनी किचकट अटी घालू नये. अशा अधिकाऱ्यांना थेट बडतर्फ करण्यात यावे. बीड आणि धाराशिवमधील असे दोन अधिकारी आहे. ही कीड नकोच आहे. वंशवाळ समिती गठीत करावी. मोडलिपी अभ्यासक नसल्याने नोंदी शोधत येत नाही. आमच्याकडे असलेल्या अभ्यासकांना नोंदी शोधण्यासाठी संधी द्या. सातारा संस्थान, हैदराबाद गॅझेट, बॉम्बे गॅझेट आणि औंध संस्थान पुरावे घेण्यात यावे. राज्यातील मुलांवर झालेल्या गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावे.”
हेही वाचा : बैठकीत गरमागरमी! ‘लई मागचे बोलू नका, तुम्हाला….’, अजितदादांनी धस यांना सुनावले
सरकार 100 टक्के फीस घेत आहे
“एसईबीसी 10 टक्के आरक्षण आम्हाला नको होते. आता 10 आरक्षण दिले तरी सरकार 100 टक्के फीस घेत आहे. आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांच्या वारसांना नोकरी देण्यात यावी. ओबीसीत आरक्षण द्यायचे असेल, तर 2012 च्या कायद्यात दुरूस्ती करा,” अशा मागण्या जरांगे-पाटील यांनी केल्या आहेत.
मुंबईची तारीख जाहीर करतो
“सगेसोयऱ्याची अंमलबाजावणी आम्हाला पाहिजे आहे. त्यासाठी आलेल्या नाहरकतीची छाननी सरकारला करायची आहे. दोन ते तीन महिन्यांत ही छाननी करू, असे आश्वासन देण्यात आले आहे. याची कार्यवाही लवकर झाली नाही, तर मुंबईची तारीख जाहीर करतो. आता माघारी यायचे नाही. मुंबईला जाताना नियोजन करावे लागेल. यासाठी 100 तुकड्या करावी लागतील. एका तुकडीत 50 हजार पोरे पाहिजेत,” असं जरांगे-पाटील यांनी सांगितलं.
मंत्री आणि त्यांच्या पोरांना धरून-धरून हाणायचे
“सगेसोयऱ्याची अंमलबाजावणी हा लहान विषय नाही. आपल्याला मुंबईला जाताना पोलिसांनी मारले, तर त्यांना बोट लावायचे नाही. मंत्री आणि त्यांच्या पोरांना धरून-धरून हाणायचे. यांना सोडायचे नाही. आम्हाला मुंबई बघून द्या. मंत्री कशी झोपतात, मंत्रालय, मंत्र्यांचे बंगले आम्हाला बघायचे आहे. मुंबईला त्रास होता कामा नये. कुणी त्रास दिला तर पळायचे नाही,” असं जरांगे-पाटील यांनी म्हटलं.
उपोषण होणार नाही
“आतापर्यंत खूप सहन केले. कुणालाही बोट लावायचे नाही. पण, कुणी वळवळ केली, तर दुमता करायचा. हे आंदोलन आपण स्थगित करत आहोत. यापुढे उपोषण होणार नाही. आता समोरा-समोर लढायची तयारी ठेवायची,” असं जरांगे-पाटील म्हणाले.
हेही वाचा : ‘डीपीडीसी’ बैठकीत मुंडेंसोबत बाचाबाची झाली? सुरेश धस म्हणाले, आमचे भांडण…