Homeमहाराष्ट्रमराठवाडाNamdev Shastri : मस्साजोगमधील आरोपींची मानसिकाताही समजून घेतली पाहिजे - नामदेव शास्त्री

Namdev Shastri : मस्साजोगमधील आरोपींची मानसिकाताही समजून घेतली पाहिजे – नामदेव शास्त्री

Subscribe

बीड – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचे मास्टरमाईंड मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड आहेत. त्यासोबतच विष्णू चाटे हा राष्ट्रवादीचा तालुकाअध्यक्ष होता. हत्याकांडातील आरोपींशी मंत्री मुंडेंचे आर्थिक संबंध असल्याचे आरोप होत आहे. धनंजय मुंडे मंत्रीपदावर असल्यामुळे संतोष देशमुख हत्याकांडाचा तपास निष्पक्षपणे होणार नाही असा आरोप करत विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री मुंडेंना अभय दिले आहे. आता भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनीही धनंजय मुंडेंना गुन्हेगार नसल्याचे प्रमाणपत्र दिले आहे. तर मस्साजोगमध्ये घडलेल्या घटनेसंबंधी ते म्हणाले की, ज्या लोकांनी हे प्रकरण केले त्यांची मानसिकता का बिघडली, हे देखील तपासले पाहिजे.

अडचणीत आलेले धनंजय मुंडे भगवान गडावर

संतोष देशमुख हत्याकांडानंतर अडचणीत आलेले धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीनंतर काल प्रथमच भगवान गडला भेट दिली. गुरुवारी रात्री त्यांनी नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. आज (शुक्रवार) सकाळी ते भगवान बाबांचे दर्शन घेणार आहेत. दरम्यान रात्री नामदेव शास्त्री आणि धनंजय मुंडे यांच्यात सामाजिक, राजकीय आणि अध्यात्मिक विषयांवर चर्चा झाल्याचे नामदेव शास्त्री यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

धनंजय मुंडे गुन्हेगार नाही – नामदेव शास्त्री

नामदेव शास्त्री म्हणाले की, धनंजय मुंडे हा राजकीय घराण्यात जन्माला आलेला मुलगा आहे. विविध पक्षाचे नेते त्याचे बालमित्र आहेत. तो गुन्हेगार नाही. त्याला गुन्हेगार का ठरवत आहेत, हे समजत नाही, असाही सवाल त्यांनी केला. भगवान गड हा भक्कमपणे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे. धनंजय मुंडे खंडणीवर जगणारा माणूस नाही, असे सांगत नामदेव शास्त्री म्हणाले की, “गेले 53 दिवस त्यांची मीडिया ट्रायल सुरु आहे.”

आरोपींची मानसिकता समजून घेतली पाहिजे – नामदेव शास्त्री

नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे. धनंजय मुंडे यांच्या पाठीमागे भगवानगड भक्कमपणे उभा आहे, असेही नामदेव शास्त्री म्हणाले. त्यासोबतच त्यांनी मस्साजोग घटनेतील आरोपींबद्दल म्हटले की, “जे गुन्हेगार आहेत त्यांचा शोध चालू आहे. ज्या लोकांनी हे प्रकरण केले, हत्या केली, त्यांची मानसिकता का बिघडली, हे मीडिया का दाखवत नाही. त्यांना मारहाण का झाली, हेही दखल घेण्याजोगे आहे. मारहाण झाली तो त्यांच्या गावाचा मुद्दा आहे.” असे नामदेव शास्त्री म्हणाले.

हेही वाचा : Beed DPDC : बीड डीपीडीसी बैठकीत खडाजंगी; अजित पवारांसमोरच धनंजय मुंडे, बजरंग सोनवणे भिडले