छत्रपती संभाजीनगर – उद्धव ठाकरे आणि एकनाश शिंदे यांच्या शिवसेना एकत्र आल्या पाहिजे, त्यासाठी मी प्रयत्न करु शकतो. असे विधान शिंदेंच्या शिवसनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी केले होते. यावर आता महायुती आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही प्रतिक्रिया आल्या आहेत. तर महायुतीतूनच टीका झाल्यानंतर मंत्री शिरसाट यांनी सूचनांचा विचार करु असे म्हटले आहे.
शिरसाट यांच्या बोलण्याला अर्थ नाही
शिंदेंच्या शिवसेनेचे गृहराज्य मंत्री योगश कदम यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची चर्चा फेटाळून लावली. संजय शिरसाट जे बोलले ते त्यांचे वैयक्तिक मत असू शकेल, ती पक्षाची अधिकृत भूमिका नाही, असं योगेश कदम म्हणाले. शिवसेनेचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार सर्व आमदारांनी एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. त्यामुळे शिरसाट यांच्या म्हणण्याला काहीही अर्थ नाही, असेही कदम म्हणाले.
त्यांचा संजय राजाराम राऊत होऊ नये…
भारतीय जनता पक्षाचे मंत्री नितेश राणे यांनी शिरसाटांच्या वक्तव्यावरुन त्यांना चांगलेच धारेवर धरले. मंत्री राणे म्हणाले की, दोन्ही शिवसेनेला एकत्र आणण्याचे त्यांनी प्रयत्न करत राहावे. पण एकनाथ शिंदे यांचं काय मत आहे? त्यांच्यासोबतच्या इतर आमदारांचं काय मत आहे? याचा विचार करावा. संजय शिरसाट आमचे मित्र आहेत. फक्त त्यांचा संजय राजाराम राऊत होऊ नये हीच अपेक्षा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
ते अटल बिहारीच आहेत….
ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही शिरसाटांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. संजय राऊत म्हणाले की, ते अटल बिहारी वाजपेयीच आहेत ना, महान माणूस आहे तो, त्याच्यामुळे ते हे करू शकतात, असा टोला त्यांनी शिरसाटांना लगावला. त्यासोबतच, “त्यांच्या ज्या भावना आहेत त्या विषयी कृतज्ञता व्यक्त करतो. मोठा माणूस आहे काही करू शकतात. ते शरद पवार, अजित पवार यांना एकत्र आणतील, असेही ते म्हणाले.
काय म्हणाले होते संजय शिरसाट?
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची गरज व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की, “मला वाटतं दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची गरज आहे. त्यांनी (उद्धव ठाकरे) दोन पावलं मागे गेलं पाहिजे, हे माझं मत आहे. ते जातील की नाही शक्यता कमी आहे. इतरांना जवळ करतील पण एकनाथ शिंदे आणि त्यांचं सूत जमेल असं सध्या तरी वाटत नाही, असंही ते म्हणाले होते. संजय शिरसाट यांनी स्वतःच्या मर्यादा काय आहेत, तेही माध्यमांसोबत बोलताना स्पष्ट केले होते. “मी शिंदेंकडे जाऊ शकतो. त्यांना एकत्र येण्याबाबत बोलू शकतो. पण तुला हा शहाणपणा करण्याची गरज काय? असं शिंदे म्हणाले तर मला थांबावं लागेल”, असं शिरसाट म्हणाले होते.
दरम्यान, शिरसाट यांच्यावर स्वपक्षीयांसह सहकारी पक्षांकडून टीका होऊ लागल्यानंतर त्यांनी यू-टर्न घेतला आहे. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. आता शिंदे आणि ठाकरे यांची चर्चा कोण घडवून आणणार असा सवाल त्यांनी केला. तर नितेश राणे हे माझे छोटे बंधू आहेत. त्याच्या आदेशाचा नाही मात्र सूचनेचा विचार करु. असे शिरसाट म्हणाले.
हेही वाचा : Nitesh Rane : महायुती अस्वस्थ नाही; राणेंचा शिंदेंच्या मंत्र्यांनाही टोला, त्यांचा संजय राजाराम राऊत होऊ नये