धनंजय मुंडे एकदम निष्क्रीय माणूस आहेत. मतदारसंघात कुठलेही कामे झाले नाहीत. गावांमध्ये जाण्यास रोड नाहीत. फक्त गुंड पाळायचे आणि हाणामाऱ्या करायच्या, यापेक्षा दुसरं काय काम केले आहे? असा सवाल उपस्थित करत परळीतील राष्ट्रवादी काँग्रसचे ( शरदचंद्र पवार ) उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी मुंडेंवर हल्लाबोल केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
राजेसाहेब देशमुख म्हणाले, “मला जाणीवपूर्वक पाच ते सहा गावांमध्ये अडविण्यात आलं. गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. सगळीकडे दहशतीचे वातावरण आहे. जनतेला मतदान करून दिलं, तर 50 हजार मतांनी माझा विजय होईल. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना ‘सीआरपीएफ’चे उमेदवार तैनात करण्यात यावे, असं मागणी केली. मात्र, त्यांनी येथील पोलीस तैनात करावे, असं सांगितलं.”
हेही वाचा : रावसाहेब दानवेंच्या कन्या भरसभेत ढसाढसा रडल्या, पतीवर केले गंभीर आरोप; म्हणाल्या, “माझ्या जागेवर…”
“पण, पोलिसच बटण दाबवण्यासाठी सामील होतात. महाराष्ट्रात कुठेही एवढी दहशत नाही. लोकसभेला परळी मतदारसंघात 80 हजार बोगस मतदान केलं. धनंजय मुंडेंनी सगळे पोलीस मॅनेज केले आहेत. कुणीही पोलीस त्यांच्याविरोधात नाहीत. मुंडेंनी सगळे अधिकारी, जिल्हाधिकारी मॅनेज करून आणले आहेत. माझा कुठल्याही अधिकाऱ्यावर भरवसा नाही,” असा आरोप राजेसाहेब देशमुख यांनी केला आहे.
“राज्य निवडणूक आयोगानं परळीत लक्ष द्यावं. बूथ एजंटला रूममध्ये बसण्यास देऊ नये. सीसीटीव्ही कॅमेरे लावले, तर ते झाकले जातात. ही कसली लोकशाही आहे? बटण दाबणारा माणूस आम्हाला दिसला पाहिजे,” अशी मागणी राजेसाहेब देशमुख यांनी केली आहे.
हेही वाचा : “तुमचा भांग कोल्हापूरकरांनी विस्कटलाय, एकदा ठरवलं की…”, सतेज पाटलांनी महाडिकांना धुतले