संभाजीनगरच्या कन्नड विधानसभा मतदारसंघात पत्नी विरुद्ध पती, अशी लढत होत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या शिवसेनेच्या ( शिंदे गट ) उमेदवार संजना जाधव आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यात लढाई होत आहे. मात्र, एकाप्रचारसभेत बोलताना संजना जाधव यांना अश्रू अनावर झाले. तसेच, जाधव यांनी हर्षवर्धन जाधव यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
हर्षवर्धन जाधव यांच्यासोबत लग्न झाल्यावर मी खूप काही सोसलं. वडील ( रावसाहेब दानवे ) म्हणाले, चाळीशी झाली की माणूस सुधारतो. मात्र, माझ्या जागेवर कोणाला आणलं, हे तुम्हाला माहिती आहे, असं म्हणत संजना जाधव यांना रडू कोसळलं.
हेही वाचा : भाजपाने पैसे दिले तर…; काँग्रेसच्या बंटी शेळकेंचे वादग्रस्त वक्तव्य
संजना जाधव म्हणाल्या, “हर्षवर्धन जाधव यांच्यासोबत लग्न झाल्यावर मी खूप काही सहन केलं. मी लग्न होऊन एक महिन्याच्या आत घरी आले. वडिलांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘तुला एक मूल होऊ दे, मूल झाल्यावर हा माणूस सुधारेल.’ मूल झाल्यावर वडिलांनी म्हटलं, ‘चाळीशी झाली की माणूस सुधारतो.’ चाळीशी झाली. जे सहन केलं, त्याचा मोबदला मला मिळाला नाही. मात्र, माझ्या जागेवर कोणाला आणलं, हे तुम्हाला माहिती आहे.”
“माझ्या वडिलांवर वाटेल ते आरोप करण्यात आले. मात्र, आम्ही सहन केलं. कारण, एका लेकीच्या बापनं ते सहन करायचं असतं. मुलाचा बाप असता, तर रस्त्यावर उतरला असता. मुलीचा बाप होता म्हणून शांत बसला. आपली मुलगी तिकडे नांदतेय, म्हणून ते काहीच बोलले नाहीत,” असं संजना जाधव यांनी सांगितलं.
“आई म्हणाली होती, ‘आता तू घरातून जात आहेस. तू परत येशील, तेव्हा तिरडीच आली पाहिजे, तू एकटी नाही आली पाहिजे.’ त्याप्रमाणे मी संसार केला. परंतु, मला काय मिळालं? मी आतापर्यंत कधीच रडले नाही. कधीच कुठल्या गोष्टीची वाच्यता केली नाही. हे गाव माझं असल्यानं, मला बोलताना भरून आलं. मी काय केलं आणि काय नाही केलं, हे सगळ्यांना माहिती आहे,” असं संजना जाधव यांनी म्हटलं.
हेही वाचा : संपूर्ण देशच ‘एक’ आहे आणि ‘सेफ’देखील, ठाकरे गटाने मोदींनी सुनावले