छत्रपती संभाजीनगर – लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले, मात्र विधानसभेत मोठा झटका बसला. राज्यात महायुतीचे बहुमताचे सरकार स्थापन झाले. आता सर्वांना वेध लागले आहेत, महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगर पंचायत या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे. मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा इरादा शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. आम्ही महाविकास आघाडीसोबत आहोत, मात्र महापालिका निवडणुका स्वबळावर लढू असे विधान आता ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा
शिवसेना ठाकरे गटाचा नुकताच बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त मुंबईत मेळावा झाला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले. ते म्हणाले की, “सर्वांचं मत आहे. एकटे लढा. ताकद आहे? अमित शहांना जागा दाखवणार का?. अजून निवडणूक जाहीर झाली नाही. तुमची जिद्द आणि तयारी बघू द्या. विधानसभेत ज्या भ्रमात राहिलो त्यातून बाहेर या. जेव्हा आपली खात्री पटेल आपली तयारी झाली. तेव्हा कार्यकर्त्यांच्या मनासारखा निर्णय घेईन.” असे म्हणत त्यांनी स्वतंत्र लढण्याची तयारी दाखवली आहे. आता ठाकरे गटाचे खासदार चंद्रकांत खैरे यांनीही स्वतंत्र लढण्याचा नारा दिला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका सध्या अधांतरी आहेत. मंगळवारी 28 जानेवारी रोजी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसंबंधी सर्वोच्च न्यायालय निर्णय देण्याची शक्यता होती. मात्र न्यायालयाने सुनावणी एक महिना पुढे ढकलली आहे. 25 फेब्रुवारी रोजी आता यासंबंधीची सुनावणी होणार आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, ठाणेसह छत्रपती संभाजीनगर महानगर पालिका निवडणूक सहा महिने पुढे गेल्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.
महायुतीला निवडणुका नको आहेत – चंद्रकांत खैरे
ठाकरे गटाचे नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले की, “न्यायालयाने 25 फेब्रुवारीची तारीख दिली आहे. त्यानंतर निकाल लागला तर आदेश निघेल. त्यानंतर दोन महिने प्रभाग रचना आणि इतर प्रक्रियेत जातील. म्हणजे तेव्हा पावसाळा सुरू होतो आणि त्यादरम्यान निवडणुका होत नाही. त्यामुळे हे सगळं असं चालू आहे. या सरकारला असं वाटत आहे की निवडणुका घेऊ नये. महायुतीमध्येच खूप भांडण चालू आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर महापालिकांमध्ये कुणाचं वर्चस्व असेल अशी स्पर्धा आता त्यांच्यामध्ये सुरू आहे. त्यामुळे त्यांना निवडणुका नको आहेत. ” असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला.
मी बाळासाहेब ठाकरेंचा कट्टर शिवसैनिक
दरम्यान चंद्रकांत खैरे यांनी दोन दिवसांपूर्वी मोठा गौप्यस्फोट केला होता. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून विविध ऑफर होत्या. भाजपकडून राज्यपाल पदाची तर शिंदे गटाने लोकसभेची उमेदवारी देण्याची तयारी दाखवली होती, असे चंद्रकांत खैरे यांनी म्हटले होते. यावर शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी चंद्रकांत खैरे यांना मीच लोकसभा निवडणूक लढण्याची ऑफर दिली होती, असे म्हटले आहे. मात्र आता कोणत्याही निवडणुका नाहीत त्यामुळे आता काही संधी नाही, असेही शिरसाट यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना म्हटले. यावर खैरे यांनीही प्रत्युत्तर देत म्हटले की, मी बाळासाहेब ठाकरेंचा कट्टर शिवसैनिक आहे. आमची महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची तयारी सुरु आहे. मी कुठेही जाणार नाही.