Homeमहाराष्ट्रमराठवाडाParbhani News : परभणीत संविधानाची विटंबना केल्याचं प्रकरण, आंबेडकरी अनुयायांच्या बंदला हिंसक...

Parbhani News : परभणीत संविधानाची विटंबना केल्याचं प्रकरण, आंबेडकरी अनुयायांच्या बंदला हिंसक वळण; दगडफेक, जाळपोळ अन्…

Subscribe

Parbhani News : पोलिसांवरही अनुयायांनी दगडफेक केली आहे. यावेळी पोलिसांनी अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या आहेत.

परभणी शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान मंगळवारी ( 10 डिसेंबर ) झाला होता. यानंतर मंगळवारी काही वेळातच शहर बंद करण्यात आलं. आज बुधवारी आंबेडकरी अनुयायांकडून परभणी बंदी हाक देण्यात आली होती. या बंदला हिंसक वळण लागलं आहे.

संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान झाल्यानं आंबेडकरी अनुयायी आक्रमक झाले. त्यामुळे बुधवारी पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले. आंबेडकरी अनुयायांकडून दुकानांची तोडफोड करण्यात आली. यानंतर काही दुकानांना आग लावण्यात आल्या.

हेही वाचा : शिंदेंच्या शिवसेनेत धुसफूस! ‘या’ सहा बड्या नेत्यांना मंत्रिपद देण्यास आमदारांचा तीव्र विरोध?

आंदोलन हिंसक वळणार गेल्यानं पोलिसांनी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पण, आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. यानंतर पोलिसांनीही अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या आहेत. तर, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

आंबेडकरी अनुयायांनी शांतता राखावी..

परभणीचे खासदार संजय जाधव यांनी आंबेडकरी अनुयायांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. “मंगळवारी घडलेली घटना ही दुर्दैवी आहे. या घटनेचा मी निषेध करतो. या घटनेशी संंबंधित नसलेल्या लोकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आंबेडकरी अनुयायांनी शांतता राखावी,” असं आवाहन संजय जाधव यांनी केलं आहे.

कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ नका..

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची किंवा दलित अस्मितेच्या प्रतिकाची तोडफोड किंवा विटंबना होण्याची ही पहिलीच वेळ नाही. वंचितन बहुजन आघाडीचे परभणी जिल्ह्यातील कार्यकर्ते प्रथम घटनास्थळी पोहोचले आहेत. त्यांनी केलेल्या निदर्शनामुळे पोलिसांनी ‘एफआयआर’ दाखल करून घेतला आहे. एका समाजकंटकाला अटक केली आहे. तरीही कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ नका. शांतता राखा,” असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

हेही वाचा : ‘तो’ एक गैरसमज अन् अपहरण करून बीडमधील सरपंचाचा केला खून, नेमकं घडलेलं काय?