धाराशिव : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही तास शिल्लक असतानाच विरारमध्ये भाजपाकडून पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडूनच पैसे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे बविआच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना विरार पूर्वेतील विवांत हॉटेलमध्ये पैसे वाटप करताना पकडले आहे. याप्रकरणी आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. (Uddhav Thackeray makes serious allegations against BJP over distribution of money by Vinod Tawde)
उद्धव ठाकरे आज तुळजापूर दौऱ्यावर होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांना विनोद तावडे यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, पैसे वाटतानाचा व्हिडीओ समोर आला असेल तर निवडणूक आयोग काय कारवाई करते, हे पाहायला हवे. कारण, काल अनिल देशमुख यांचं डोकं आपोआप फुटलं, आज पैसे वाटतानाचा व्हिडीओ समोर आला असेल तर हे जाईचे पैसे आले कुठून? ते कोणाच्या खिशात जात होते? आज आई तुळजाभवानीच्या दर्शनाला जाताना माझी बॅग तपासली, मग यांच्या बॅगेतले पैसे आणि दगड तपासणार कोण? असा प्रश्न उपस्थित करत निवडणूक आयोगाने याप्रकरणी कठोर कारवाई करावी, अन्यथा आयोगावर कारवाई करण्यासाठी आम्हाला कठोर पाऊलं उचलावी लागतील, असा इशारा ठाकरेंनी दिला.
हेही वाचा – Attack on Anil Deshmukh Car : गाडीवरील हल्ल्याप्रकरणी अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हटले…
विनोद तावडे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यासंदर्भात प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले की, गुन्हा दाखल करून आरोपी फरार झाला नाही पाहिजे. कदाचित हे त्यांच्यातील गँगवॉर असू शकते. नाशिकमध्ये पैसे वाटताना काही जण फरार झाले, असे माझ्या ऐकीवात आहे. याबद्दल मला काही खरी माहिती नाही. पण निवडणूक आयोगानं निष्पक्षपणे चौकशी केली पाहिजे. खरं तर विनोद तावडे जर का आता तावडीत सापडले असतील तर त्यांनी आतापर्यंतची सरकार कशी पाडली आणि कशी बनवली याचा हा पुरावा आहे. ज्या जागरुकतेनं हे कपटकारस्थान घडलं असेल, ज्यांनी हे उघडकीस आणलं असेल तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे. भाजपाअंतर्गत किंवा शिंदे गटाकडूनही गँगवॉर असू शकतं, अशी शक्यताही ठाकरेंनी बोलून दाखवली.
पैसा बाटेंगे और जितेंगे असं काही आहे का?
दरम्यान, महायुतीवर निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रानं बघायला हवं की, यांच्या योजना कशा फसव्या आहेत. बहिणींना 1500 रुपये द्यायचे आणि यांना थप्याच्या थप्या द्यायच्या. खंर तर हे महाराष्ट्र उघड्या डोळ्यानी पाहतोय. भाजपा, शिंदे आणि अजित पवारांचा नोट जिहाद आहे का? पैसा बाटेंगे और जितेंगे असं काही आहे का? हे सर्व महाराष्ट्रानं हे पाहिलेलं आहे, त्यामुळे उद्याच्या निवडणुकीत राज्य निर्णय घेईल. परंतु काही दिवसांपूर्वी विनोद तावडे याचं कौतुक होत होतं. काही राज्यात त्यांनी सरकार पाडलं, काही राज्यात त्यांनी भाजपाचं सरकार आणलं, त्याचं गुपित काय ते आता समोर आलं आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोगाने सर्व पुरावे घेऊन कारवाई करावी, अन्यथा महाराष्ट्र कारवाई करेल, असा इशारा सुद्धा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.