बीड – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांची मानसिकता समजून घेतली पाहिजे होती, त्यांनाही मारहाण झाली, त्यानंतर मस्साजोगमध्ये संतोष देशमुखांची हत्या झाली, असे वादग्रस्त वक्तव्य भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याने नाराज झालेल्या देशमुख कुटुंबियांनी आज (रविवार) नामदेव शास्त्रींची भेट घेऊन त्यांना आरोपींच्या गुन्ह्यांचा इतिहास आणि मस्साजोगमधील भांडणाचे कारण सांगितले. त्यानंतर नामदेव शास्त्रींनी दोनच दिवसानंतर यू-टर्न घेत भगवानगड गुन्हेगारांच्या पाठीशी नाही, अशी भूमिका घेतली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी नाही तरीही त्यांना गुन्हेगार ठरवले जात आहे. आमच्या क्षेत्रात तो असता तर संत पदाला गेला असता, असेही नामदेव शास्त्री म्हणाले होते.
नामदेव शास्त्रींचा दोनच दिवसांत यू-टर्न
मंत्री धनंजय मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी भगवानगडावर मुक्काम केला होता. त्यानंतर गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नाहीत. गेल्या 52 दिवसांपासून त्यांची मीडिया ट्रायल केली जात आहे. मीडियाने मस्सजोग येथील हत्येच्या घटनेतील आरोपींचीही मानसिकता समजून घेतली पाहिजे होती. या घटनेमुळे जातियवाद वाढला आहे. ज्यांना जातियवाद माहित नाही, त्यांनाही या घटनेने जातियवादाची माहिती झाली आहे. भगवानगड पूर्णपणे, 100 टक्के धनंजय मुंडे यांच्या पाठीशी असल्याचे वक्तव्य केले होते.
नामदेव शास्त्रींच्या या वक्तव्याने राजकीय आणि सामाजिक अशा चहूबाजूंनी त्यांच्यावर हल्लाबोल होऊ लागला. नामदेव शास्त्रींनी हल्लेखोरांची मानसिकता समजून घेतली पाहिजे होती, असे वक्तव्य केल्याने राज्यभरातून त्यांच्यावर टीका होत होती. या सर्व पार्श्वभूमीवर मृत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय आणि मुलगी वैभवी यांनी आज नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. त्यांनी देशमुख हत्याकांडातील आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी शास्त्रींच्या निदर्शनास आणून दिली. मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड याच्यावर 15 गुन्हे दाखल आहेत. तर इतरही सात आरोपींची पार्श्वभूमी गुन्हेगारी असल्याचे पुरावे शास्त्रींना दिले.
आमची मानसिकता काय असली पाहिजे; वैभवीचा संतप्त सवाल
वैभवी देशमुखने शास्त्रींना संतप्त सवाल करत म्हटले की, तुम्ही म्हणाले एक चापट मारली म्हणून हत्या झाली. हल्लेखोरांची मानसिकता समजून घेतली पाहिजे होती. माझ्या वडिलांवर एवढे घाव करण्यात आले, त्यांच्या शरीराचा एकही अवयव हल्लोखोरांनी सोडला नव्हता. त्यांच्या अंत्यसंस्करांनंतर फक्त तीन हाडं मिळाली होती. मग आमची मानसिकता काय असली पाहिजे, असा संतप्त सवाल वैभवी देशमुखने नामदेव शास्त्रींना केला. आरोपींची बाजू घेण्याआधी तुम्ही आमची बाजू ऐकून घ्यायला पाहिजे होती. असेही वैभवी देशमुखने शास्त्रींना म्हटले.
माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला – नामदेव शास्त्री
धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख यांनी गुन्हेगारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचे पुरावे दिल्यानंतर नामदेव शास्त्री यांनी भगवानगड आरोपींच्या पाठीशी नाही तर संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्य पाठीशी असल्याचे म्हटले. माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला. भगवान गड कधीही गुन्हेगारांसोबत नाही, असेही ते म्हणाले.