घरताज्या घडामोडी'मी पक्षात राहू नये असे काही नेत्यांना वाटते!' माथाडी नेते नरेंद्र पाटील...

‘मी पक्षात राहू नये असे काही नेत्यांना वाटते!’ माथाडी नेते नरेंद्र पाटील यांचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’

Subscribe

माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये नरेंद्र पाटील यांनी शिवसेना पक्ष सोडत असल्याची घोषणा केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार सध्या अडचणीत सापडले आहे. त्यातच आता माजी आमदार आणि माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पाटील यांनी सातारा मतदार संघातून शिवसेनेचे उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, मंगळवारी त्यांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करण्याची घोषणा केली आहे. मी पक्षात राहू नये असे काही नेत्यांना वाटत असल्याने मी शिवसेना सोडत असल्याचे त्यांनी सांगितले. नरेंद्र पाटील यांच्यासारख्या नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने शिवसेनेला धक्का बसला आहे.

माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये नरेंद्र पाटील यांनी शिवसेना पक्ष सोडत असल्याची घोषणा केली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येऊन दीड वर्ष लोटले तरी मुख्यमंत्र्यांनी माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवलेले नाहीत. माथाडींच्या प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी वेळ मागूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट झालेली नाही, असेही पाटील म्हणाले.

- Advertisement -

तसेच माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व माझ्यात चांगले संबंध असल्याचे शिवसेनेच्या नेत्यांना खूपत होते. तसेच मी शिवसेनेत राहू नये असे पक्षातील नेत्यांना वाटत असल्याने मी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेत आहे, असे पाटील यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा करताना सांगितले.

नरेंद्र पाटील हे सुरुवातीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस सोडून ते भाजपमध्ये आले. मात्र, २०१९ मध्ये साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, त्या निवडणुकीत उदयनराजे भोसलेंकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. परंतु, दोन दिवसांपूर्वीच उदयनराजे भोसले आणि पाटील यांच्यातील गळाभेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे पाटील यांच्याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -