पवन एक्सप्रेसमध्ये माथेफिरुचा अ‍ॅसिड हल्ला

मनमाड : पवन एक्सप्रेसच्या वातानुकूलित डब्यात एका माथेफिरूने प्रवाशावर अ‍ॅसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि.२३) मनमाड रेल्वेस्थानकावर घडली. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच आरपीएफ निरीक्षक शिरीष ढेंगे यांच्यासह आरपीएफ पथकाने घटनास्थळी धाव घेऊन माथेफिरुला ताब्यात घेत रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. माथेफिरूने केलेल्या अ‍ॅसिड हल्ल्यात दोन प्रवासी व दोन आरपीएफ जवान किरकोळ जखमी झाले.

धनेश्वर यादव (रा. भागलपूर, बिहार) असे ताब्यात घेण्यात आलेल्या माथेफिरुचे नाव आहे. जवान धर्मेंद्र यादव व विनायक आठवले अशी जखमी झालेल्या आरपीएफ जवानांची नावे आहेत. माथेफिरूने मुंबईहून दरभंगाकडे जाणार्‍या पवन एक्सप्रेसच्या एसी डब्यात धुमाकूळ घातला. तो प्रवाशांवर अ‍ॅसिड हल्ला करत असल्याची माहिती आरपीएफ जवानांना मिळाली. रेल्वे नाशिकहून-मनमाडला जात होती. आरपीएफ निरीक्षक शिरीष ढेंगे यांच्यासह एएसआय ठाकरे, सोमवंशी, दुबे, आरपीएफचे धर्मेंद्र यादव, विनायक आठवले मनमाड रेल्वेस्टेशनमधील प्लॅटफार्म तीनवर गेले. रेल्वे येताच जवानांनी एसी डब्याकडे धाव घेतली. जवानांना पाहताच माथेफिरूने स्वतःला रेल्वेतील शौचालयात कोंडून घेतले. यावेळी आरपीएफ अधिकार्‍यांनी त्याला बाहेर येण्याचे आवाहन केले. मात्र, त्याने नकार देताच जवानांनी शौचालयाच्या दाराचा कडी व कोयंडा तोडला. तितक्यात माथेफिरूने जवानांच्या अंगावरही अ‍ॅसिड फेकले. त्यामुळे रेल्वे स्टेशनवर खळबळ उडाली. अखेर आरपीएफ जवानांनी धाडस करून माथेफिरूला ताब्यात घेतले.

अ‍ॅसिड हल्ल्यात आरपीएफ जवान धर्मेंद्र यादव व विनायक आठवले यांच्यासह दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले. जवानांनी त्याला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याने हे कृत्य का केले, याचा रेल्वे पोलीस निरीक्षक जोगदंड
तपास करत आहेत.

कुठून आले अ‍ॅसिड ?

माथेफिरु धनेश्वर यादव हा पेंटर असल्याचे समजते. त्याच्याकडे रंगकामासाठीचे नायट्रिक अ‍ॅसिड होते. त्या अ‍ॅसिडने त्याने प्रवाशांवर हल्ल्या केल्याचे सांगितले जाते आहे.