पुण्यात मविआला खिंडार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अनेक पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

मुंबई – भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघासाठी राज्यासह केंद्रातील अनेक नेत्यांनी धावते दौरेही केले आहेत. आता भाजपासह शिंदे गटानेही पवार कुटुंबीयांच्या बालेकिल्ल्यातच सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला आहे. महाविकास आघाडीतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश झाला आहे.

आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष सर्वांच्या निशाण्यावर आहे. त्यामुळे भाजपासह शिंदे गटानेही कंबर कसली आहे. मागच्या निवडणुकीत विजय शिवतारे यांचा अजित पवारांनी पराभव केला होता. या परभवाचा बदला घेण्याकरता विजय शिवतारे यांनी बारामतीतच सुरुंग लावण्यााच प्रयत्न केला आहे. त्यानुसार, पुण्यातील बारामती, दौंड, इंदापूर, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांची शिवेसना पक्षात प्रवेश केला आहे.

मंत्रालयातील बाळासाहेब भवन येथे हा पक्षप्रवेश झाला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही तिथे उपस्थित होते. माजी आमदार नारायण आबा पाटील, इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष महारुद्र पाटील, इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष जगताप, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस वसंतराव अरडे, वरवंटे बुद्रुकचे माजी सरपंच नामदेव बनकर, देविदास भोंग, वैभव जामदार, दौंड मधील धनगर समाजाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव पांडुरंग मेरगळ, विजय मदनेंसह आदींनी शिंदे गटात प्रवेश केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईत येऊन महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचे भूमिपूजन केले. तसंच, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाही टप्प्यात आहेत. त्यादृष्टीने सर्वांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात झाली आहे.