नाशिकच्या माया सोनवणे, प्रियांका घोडके महाराष्ट्र क्रिकेट संघात

बीसीसीआयतर्फे ३१ ऑक्टोबरपासून होणार्‍या एकदिवसीय सामन्यांसाठी दोघी झाल्या रवाना

Cricket Team Nashik

नाशिकच्या माया सोनवणे व प्रियांका घोडके ह्या दोघींची महाराष्ट्रातर्फे वरिष्ठ महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)तर्फे आयोजित ऑक्टोबरमध्ये होणार्‍या एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेसाठी ही निवड झाली आहे. महिला एकदिवसीय  सामन्यांच्या  स्पर्धेचे साखळी सामने डेहराडून येथे ३१ ऑक्टोबर पासुन सुरु होणार आहेत. महाराष्ट्राचा एलिट ए गटात समावेश आहे. स्पर्धेच्या तयारीसाठी भोपाळ, मध्य प्रदेश येथे सराव सामने आयोजित केले असुन, त्यासाठी  महाराष्ट्र वरिष्ठ महिला क्रिकेट संघाचा २० जणांचा चमु रवाना झाला आहे.

माया सोनवणेची, हंगामाच्या सुरुवातीसच भारतीय संघाच्या राष्ट्रीय शिबिरासाठी संभाव्य ३५ खेळाडुं मध्ये निवड झाली होती. उत्कृष्ट लेगास्पिनर माया मधल्या फळीतील भरवशाची फलंदाज देखील आहे. पुदुचेरी येथे झालेल्या २३ वर्षाखालील टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना तिने लक्षणीय कामगिरी केली होती. १९ व २३ वर्षांखालील वयोगटासह, वरिष्ठ महिला क्रिकेट संघातही मायाने महाराष्ट्रतर्फे पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्व केले आहे. २०१४-१५ तसेच २०१८-१९ च्या हंगामात १९ व २३ वर्षांखालील एकदिवसीय स्पर्धेमध्ये मायाने भारतामध्ये सर्वाधिक २३ व २१ गडी बात करण्याचा पराक्रम केला होता. आतापर्यंतच्या ह्या सगळ्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर मायाची मागील हंगामात बीसीसीआयच्या प्रतिष्ठेच्या चॅलेंजर ट्रॉफीसाठी इंडिया ए संघातदेखील निवड झाली होती .त्यात दोन सामन्यात ३ बळी घेतले होते.

प्रियांका घोडके आघाडीची फलंदाज व ऑफ स्पिनर आहे. प्रियांकाने महाराष्ट्रातर्फे तेवीस वर्षांखालील महिला क्रिकेट संघाचे, नोव्हेंबर २०१९ मध्ये पुदुचेरी येथे झालेल्या टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेत प्रतिनिधित्व करतांना फलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी केली होती. २०१८-१९ च्या हंगामात, टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेत महाराष्ट्रातर्फे सर्वाधिक बळी घेतले होते. तसेच, महत्वाच्या सामन्यात अर्धशतके झळकाविली आहेत. प्रियांकानेदेखील १९ व २३ वर्षांखालील वयोगटासह, वरिष्ठ महिला क्रिकेट संघातही महाराष्ट्रतर्फे पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्व केले आहे.

महिला क्रिकेटमधील या निवडीमुळे नाशिकच्या क्रिकेटविश्वात आनंदमय वातावरण निर्माण झाले असून, सदर निवडी बद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे व पदाधिकारी यांनी या दोन्ही महिला क्रिकेटपटूंचे अभिनंदन करून स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.