घरमहाराष्ट्रजाणून घ्या कोणत्या शहराचं महापौरपद कोणाकडे?

जाणून घ्या कोणत्या शहराचं महापौरपद कोणाकडे?

Subscribe

कोणत्या शहराचं महापौरपद कोणाकडे गेले आहे. कोणाची वर्णी लागली?

राज्यातील काही ठिकाणी आज महापौपपदाच्या निवडणुका पार पडल्या. महाराष्ट्रातील सत्तास्थापने तिढा अद्याप सुटलेला नाही. त्याच वेळी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक,लातूर, अमरावती यासारख्या महापालिकांच्या महापौरपदांची निवडणूक पार पडलेली आहे. महाराष्ट्रात भाजप पक्ष सत्तास्थापनेपासून दूर दिसत असला तरी मात्र, मुंबई वगळता बहुतांश महापौरपदांवर भाजपचे उमेदवार विराजमान झाले आहेत.

मुंबई महापालिकेच्या महापौरपदी किशोरी पेडणेकर

- Advertisement -

मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उपमहापौरपदी सुहास वाडकर यांची वर्णी लागली आहे. महापौरपदाच्या निवडणुकीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीलाच पिठासीन अधिकारी विश्वनाथ महाडेश्वर यांनी महापौरपदासाठी एकही अर्ज न आल्याने किशोरी पेडणेकर यांची या पदासाठी निवड झाली आहे.

ठाणे महापालिकेवर पुन्हा भगवा झेंडा फडकला

- Advertisement -

ठाणे महापालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकला आहे. ठाण्याच्या २२ व्या महापौरपदी शिवसेनेचे नरेश म्हस्के आणि उपमहापौरपदी पल्लवी कदम यांची बिनविरोध निवड झाली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी आपल्या पदभार स्वीकारला. ठाण्याच्या विकासासाठी आपण कटिबध्द राहणार असून नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर भर देणाार असल्याचे नवनिर्वाचित महापौर म्हस्के यांनी सांगितले.

उल्हासनगरला भाजपाला मोठा धक्का

उल्हासनगर महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. कारण महासेनाआघाडीच्या बळावर शिवसेनेच्या उमेदवार लीलाबाई आशन महापौर झाल्या असून आशान यांना टीम ओमी कलानी आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे.

पुण्याच्या महापौरपदी भाजप

पुण्याच्या महापौरपदी भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांची निवड झाली आहे. तर मोहोळ यांना ९७ मतं मिळाली होती. राष्ट्रवादीचे उमेदवार प्रकाश कदम यांना ५९ मतं पडली असून शिवसेनेने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळे पुणे महापौरपदाच्या निवडणुकीत महासेनाआघाडी पाहायला मिळाली आहे.

नागपूरच्या महापालिकापदी भाजप

नागपूरचे महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे संदीप जोशी यांची वर्णी लागली आहे. तर उपमहापौरपदी मनिषा कोठे यांची निवड झाली आहे.

परभणी महापालिकेच्या महापौरपदी कॉंग्रेस

परभणी महापालिकेच्या महापौरपदी कॉंग्रेसच्या अनिता रविंद्र सोनकांबळे यांची निवड झाली आहे. तर उपमहापौरपदी भगवान वाघमारे यांची वर्णी लागली असून भाजपचे मोकिंद खिल्लारे यांचा पराभव झाला आहे.

पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या ढोरे

पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या उषा उर्फ माई ढोरे यांची निवड झाली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाती काटे या पराभूत झाल्या आहेत.

महाविकासआघाडीचा भाजपला ‘दे धक्का’

लातूरमध्ये भाजपचे माजी मंत्री संभाजी निलंगेकर यांना मोठा झटका बसला आहे. लातूरच्या महापौरपदी काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे यांची निवड झाली आहे. लातूर महापालिकेची सत्ता भाजपकडून काँग्रेसने हिसकावली आहे. भाजपचे अॅड. शैलेश गोजमगुंडे यांना ३३ मते पडली असून ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. तर काँग्रेसच्या विक्रांत गोजमगुंडे यांना ३५ मते पडली आहे. अवघ्या दोन मतांनी भाजपच्या अॅड. शैलेश गोजमगुंडे यांचा काँग्रेसच्या विक्रांत गोजमगुंडे यांनी पराभव केला आहे.

अकोला महापालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या मसने

अकोला महापालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या अर्चना जयंत मसने आणि उपमहापौरपदी राजेंद्र गिरी यांची निवड निश्चित झाली आहे. कॉंग्रेसचे अजराबी नसरीन आणि शिवसेनेच्या मंजुषा शेळके यांनी सुद्धा या पदासाठी अर्ज घेतले होते. मात्र, भाजपाचे महापालिकेत संख्याबळ बघता महापौरपदी अर्जना मनसे आणि उपमहापौरपदी राजेंद्र गिरी यांनी निवड निश्चित झाली.

चंद्रपूर महापौरपदी राखी कंचर्लावार

चंद्रपूर महापौरपदी भाजपच्या उमेदवार राखी कंचर्लावार यांची निवड झाली आहे. कंचर्लावार यांना ४२ मतं, तर काँग्रेस उमेदवार कल्पना लहामगे यांना २२ मतं मिळाली. २ नगरसेवक अनुपस्थित राहिले होते. तर उपमहापौरपदी भाजपच्या राहुल पावडे यांचा विजय झाला आहे. पावडे यांना ४२ तर काँग्रेसच्या अशोक नागापुरे यांना २२ मतं मिळाली. भाजपने आपला सत्तागट कायम राखण्यात यश मिळवलं. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची निकराची लढाई सफल झाल्याचं दिसतं आहे.

नाशिकमध्ये भाजपचा काठावर बचाव

नाशिक महापौरपदाच्या निवडणुकीत अनोखे ट्विस्ट पाहायला मिळाले. भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी पुन्हा पक्षाला संकटातून तारत महापौरपद राखण्यास मदत केली. त्यामुळे नाशिकच्या महापौरपदी भाजपचे सतीश कुलकर्णी बिनविरोध निवडून आले आहेत. नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाचे सुमारे १३ नगरसेवक फोडण्याचा दावा करणाऱ्या शिवसेनेला नाशिकचे माजी पालकमंत्री तथा भाजप नेते गिरीश महाजन यांनी तोंडघशी पाडले आहे. महापालिकेत सत्ता स्थापन होईल, इतके संख्याबळ भाजपला पुन्हा मिळवून देण्यात महाजन यशस्वी झाले आहेत. यासाठी त्यांना मनसेची मोठी मदत मिळाल्याची जोरदार चर्चा नाशिकच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. गिरीश महाजनांच्या या ट्रबलशूटिंगमुळे आता नाशिकच्या महापौरपदी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सतीश कुलकर्णी यांची बिनधोक नियुक्ती झाली असून उपमहापौरपदासाठी ८२ वर्षांच्या भिकुबाई बागूल यांना संधी मिळणार आहे.

अमरावतीचे महापौरपद अमरावतीकडे

अमरावतीच्या महापौरपदी भाजपचे चेतन गावंडे तर उपमहापौरपदी भाजपच्या कुसुम साहू यांची निवड झाली. महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या प्रदीप हिवसे यांचा पराभव करण्यात भाजपाला यश आले आहे.

कोल्हापूरमध्ये महाशिवआघाडीला यश

कोल्हापुरात महाशिवआघाडीला पहिले यश आले आहे. कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अ‍ॅड. सुरमंजिरी लाटकर यांची वर्णी लागली असून उपमहापौरपदी काँग्रेसचे संयज मोहिते यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अ‍ॅड. सुरमंजिरी लाटकर यांनी भाजप – ताराराणी आघाडीच्या उमेदवारांचा ११ मतांनी पराभव केला आहे. लाटकर यांना ४३ मते तर विरोधी उमेदवार भाग्यश्री शेटके यांना ३२ मते मिळाली आहेत. मोहिते यांना ४३ तर विरोधी ताराराणीचे कमलाकर भोपळे यांना ३२ मते मिळाली आहेत. या दरम्यान, सर्वांचे लक्ष हे शिवसेनेकडे लागले होते. मात्र, यावेळी शिवसेनेचे चारही नगरसेवक गैरहजर राहिल्याचे पाहायला मिळाले आहे.


हेही वाचा – पालघरमध्ये पीएसीएल घोटाळ्यातील ४९ हजार कोटींची मालमत्ता; ईडीकडे तक्रार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -