घरताज्या घडामोडी'मी आणि फक्त मीच' हे मोदींचे धोरण, हा अहंकार लोकशाहीला घातक ;...

‘मी आणि फक्त मीच’ हे मोदींचे धोरण, हा अहंकार लोकशाहीला घातक ; सामनातून पंतप्रधानांवर हल्लाबोल

Subscribe

पंतप्रधानांच्या हस्ते दिल्लीतील भाजप मुख्यालयाचे दिमाखदार उद्घाटन झाले तसेच नव्या संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे. या नवीन संसद भवनाच्या उद्घटनावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या याचिकेत सर्वोच्च न्यायालयाकडून लोकसभा सचिवालयाला नवीन इमारतीचे उद्घाटन राष्ट्रपतींकडून करण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, ‘मी आणि फक्त मीच’ हे मोदींचे धोरण असून हा अहंकार लोकशाहीला घातक असल्याची टीका शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या दैनिक सामनामधून करण्यात आली आहे.

भारतीय जनता पक्ष लोकांना भ्रमित करण्यात पटाईत आहे. लोकांना पेडगावचा रस्ता दाखवायचा व वेडगावला न्यायचे असे त्याचे धोरण आहे. दिल्लीत रविवारी नव्या संसद भवनाचे उद्घाटन होत असून 20 विरोधी पक्षांनी उद्घाटन सोहळय़ावर बहिष्कार टाकला आहे. बहिष्काराची पर्वा न करता पंतप्रधान मोदी यांनी फीत कापण्याचे ठरवले असेल तर तो त्यांचा प्रश्न. संसद भवनाच्या उद्घाटन सोहळय़ावर 20 राजकीय पक्षांनी बहिष्कार टाकला यावर भाजपचे लोक टीका करीत आहेत, पण सत्य असे आहे की, 20 प्रमुख पक्षांचा विरोध नव्या संसद भवनाच्या उद्घाटनास नाही. उद्घाटनाचे साधे निमंत्रणही राष्ट्रपतींना नाही हा वादाचा मुद्दा आहे. संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्याच हस्ते होणे हे परंपरेला धरून झाले असते, पण ‘‘हे नवे संसद भवन मी बांधले, ही माझी इस्टेट आहे. त्यामुळे उद्घाटनाच्या कोनशिलेवर फक्त माझेच नाव राहील. मी आणि फक्त मीच!’’ असे मोदींचे धोरण आहे. हा अहंकार लोकशाहीला घातक आहे, असा हल्लाबोल सामनातून नरेंद्र मोदी यांच्यावर करण्यात आला आहे.

- Advertisement -

नवे संसद भवन ही भारतीय संस्कृती आणि परंपरांशी आधुनिकतेची नाळ जोडणारी इमारत असून समृद्ध लोकशाहीचे प्रतीक असल्याचे गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले. लोकशाहीवर या मंडळींनी बोलणे हा विनोद आहे. नवे संसद भवन हे काही एखाद्या पक्षाच्या मालकीचे नाही ते देशाचे आहे. नटवरलाल नावाच्या एका भामटयाने संसद भवन, राष्ट्रपती भवन, ताजमहाल, इंडिया गेट बनावट कागदपत्रांद्वारे विकल्याची एक दंतकथा प्रसिद्ध आहे. तसे हे नवे संसद भवन बनावट कागदपत्रांद्वारे कुणी मालकीचे करून घेतले आहे काय? संसद भवन व त्यावरील सिंहाची तीन तोंडे म्हणजे भारतीय लोकशाहीचे प्रतीक आहे, पण या सिंहांनी गर्जना करू नये, रौद्ररूप धारण करू नये असे श्रीमान पंतप्रधानांना वाटत आहे. ज्यांना हे लोक विरोधक म्हणतात ते सध्याच्या राज्यकर्त्यांपेक्षा जास्त देशभक्त आहेत. त्यांची भूमिका काय आहे, तर राष्ट्रपतींचा सन्मान राखला पाहिजे. राष्ट्रपती केवळ देशाचे प्रमुख नसतात, तर संसदेचे अविभाज्य घटकही असतात, अशीही टीका सामनातून मोदींवर करण्यात आली आहे.

राष्ट्रपतींविना संसद कार्यरत राहू शकत नाही. राष्ट्रपती हेच संसदेचे सर्वाधिकारी असतात. पंतप्रधान मोदी यांनी नव्या संसद भवनाच्या उद्घाटन समारंभाचे साधे निमंत्रणही राष्ट्रपतींना दिले नाही, असे काँग्रेस, शिवसेनेसह 20 राजकीय पक्षांचे म्हणणे आहे. महाराष्ट्रातील भाजप भजनी मंडळातील टाळकुटय़ांनाही यानिमित्ताने कंठ फुटला आहे. शिवसेनेने उद्घाटन सोहळय़ावर बहिष्कार टाकला, पण श्रीमान उद्धव ठाकरे यांना बोलवतेच कोण? असे सवाल देवेंद्र फडणवीस वगैरेंनी विचारले. ही त्यांची टाळकुटी संस्कृती आहे. ज्या आडवाणींमुळे भाजपला आजचे ‘अच्छे दिन’ पाहायला मिळाले, त्यांना तरी नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळय़ाचे निमंत्रण दिले काय? की त्यांनाही गेटवरच अडवले जाणार आहे ते आधी सांगा. जेथे देशाच्या राष्ट्रपतींनाच उद्घाटन सोहळय़ाचे निमंत्रण नाही, तेथे तुम्हा-आम्हाला निमंत्रण असले किंवा नसले काय, काय फरक पडतोय?, असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Election 2024 : लोकसभेसाठी भाजप-सेनेचा २६-२२चा फॉर्म्युला ठरला?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -