मुंबई : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघावरून शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर आणि ज्येष्ठ नेते रामदास कदम यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढली आहे. तर, यावरून ठाकरे गटाने ‘गद्दारी’च्या मुद्द्यावरून दोन्ही नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. उभय नेते एकमेकांवर करत असलेले आरोप म्हणजे, शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसत असल्याची ही कबुली आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आमदार अनिल परब यांनी दिली आहे.
हेही वाचा – एका दिवाळीत खऱ्याखुऱ्या शेतकऱ्याच्या बांधावर जावे, ठाकरे गटाचा पंतप्रधान मोदींना सल्ला
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे गजानन कीर्तिकर हे खासदार आहेत. मात्र, आजारपणामुळे कीर्तिकर निवडणूक लढवणार नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे रामदास कदम यांनी आपला मुलगा सिद्धेश कदम यांना उमेदवारी देण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. यावरूनच आता गजानन कीर्तिकर आणि रामदास कदम यांच्यात गद्दार, बेईमान असा उल्लेख करत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
सन 1990च्या विधानसभा निवडणुकीत मालाड मतदारसंघातून मला पाडण्यासाठी माझ्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांना आणि अधिकाऱ्यांना रामदास कदम आपल्या गावी घेऊन गेले होते. माझ्या पराभवासाठी यांनी भरपूर प्रयत्न केले. पण त्यात त्यांना यश आले नाही. हा पक्षाशी विश्वासघात होता. तसेच, 2014च्या लोकसभा निवडणुकीत अनंत गीते यांना पाडण्यासाठीही कदम यांनी निष्फळ प्रयत्न केला होता, असा आरोप गजानन कीर्तिकर यांनी केला आहे.
हेही वाचा – ललित पाटील प्रकरणी मोठी अपडेट; आणखी चार जणांची नावं समोर
रामदास कदम यांनी याला प्रत्युत्तर दिले आहे. कीर्तिकरांचा मुलगा उद्धव ठाकरेंसोबत आहे आणि ते स्वतः एकनाथ शिंदेंसोबत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही. स्वतः उमेदवारी घेऊन घरी बसून मुलाला बिनविरोध निवडून आणण्याची खेळी करू नका आणि पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसू नका, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
यावर ठाकरे गटाने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे गटातील एवढे ज्येष्ठ नेते भांडत आहेत, एकमेकांवर ‘गद्दारी’चे आरोप करत आहेत. ही गद्दारी बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना केलेली होती. पण आज आम्ही त्यांना गद्दार म्हटल्यावर राग येतो, असे राज्याचे माजी मंत्री अनिल परब यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडून हे सर्व नेते शिंदे गटात सामील झाले. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला दिलेल्या साथीला विरोध आणि बाळासाहेबांचे विचार असे कारण त्यांनी दिले. पण याच बाळासाहेबांच्या हयातीत शिवसेनेचेच उमेदवार पाडापाडीचे प्रयत्न यांनी केले. हेच बाळासाहेबांनी तुम्हाला शिकवले होते का? याचाच अर्थ ते बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत ते खंजीर खुपसत होते, असा थेट आरोप त्यांनी केला.