आता गोवरग्रस्त रुग्णांनाही केलं जाणार क्वारंटाईन; टास्क फोर्सचे आदेश

राज्यात कोरोना महामारीनंतर आता गोवर आजाराने डोक वर काढलं आहे. मुंबईसह अनेक जिल्ह्यात गोवरच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढतेय. राज्यातील गोवरबाधित रुग्णांची संख्या 658 वर पोहोचली आहे. आता गोवरवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. जिल्हा प्रशासन आणि महापालिकेने गोवरबाधित रुग्णांसाठी देखील क्वारंटाईन सेंटर सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांप्रमाणे आता गोवरबाधित रुग्णांनाही क्वारंटाईन केले जाणार आहे.

राज्यात गोवरचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतोय. यात रविवारी संशयित गोवर रुग्णांची संख्या 10 हजार 544 वर पोहोचली आहे. ज्यामुळे आरोग्य यंत्रणेकडूनही गोवर आजारावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. राज्यात गेल्या तीन वर्षांपासून कोरोना महामारीने थैमान घातले. ही कोरोनाग्रस्तांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आला, यात आता गोवर रुग्णांसाठी देखील राज्यात क्वारंटाईन सेंटर उभारले जाणार आहेत.

गोवरचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी टास्क फोर्सने लागण झालेल्या रुग्णांना क्वारंटाईन करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे गोवरची लागण झालेल्या मुलांना किमान सात दिवसांसाठी क्वारंटाईन करा, असे निर्देश टाक्स फोर्सच्या बैठकीत जिल्हा प्रशासन आणि महापालिकांना देण्यात आले आहेत. यासाठी आता रुग्णालयांना देखील व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत.

यासोबत कुपोषित बालकांना गोवरची लागण झाली असेल तर त्यांची काळजी घेणं गरजेचे आहे. अन्यथा त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कुपोषित बालकांचे सर्वेक्षण करुन या बालकांना आवश्यक पोषण आणि जीवनसत्व अ चा डोस द्यावा असे निर्देश टास्क फोर्सने प्रशासनाला दिले आहेत.


हेही वाचा : चीनमध्ये लॉकडाऊनला विरोध; पण एकाच दिवसात ४० हजार नवे कोरोनारुग्ण