मोठी बातमी! मेधा सोमय्यांचा संजय राऊतांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा

शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी आम्हाला घाबरवण्यासाठी घोटाळ्याचा आरोप केला होता. परंतु त्यात आम्ही एका रुपयाचाही घोटाळा केलेलं आढळलं नाही. 2016 लाही उद्धव ठाकरे यांनी 'सामना' तून आमच्यावर 112 कोटींच्या घोटाळ्याचा निराधार आरोप केला होता.

KIRIT SOMAIYA
KIRIT SOMAIYA

मुंबईः भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. त्यानंतर किरीट सोमय्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना संजय राऊतांवर टीकास्त्र डागलं आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी आम्हाला घाबरवण्यासाठी घोटाळ्याचा आरोप केला होता. परंतु त्यात आम्ही एका रुपयाचाही घोटाळा केलेलं आढळलं नाही. 2016 लाही उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ तून आमच्यावर 112 कोटींच्या घोटाळ्याचा निराधार आरोप केला होता. त्यामुळेच आता संजय यांच्याविरोधात आज अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला असल्याचंही किरीट सोमय्यांनी सांगितलंय.

संजय राऊत म्हणजे उद्धव ठाकरे, कारण बोंबाबोंब, आरडाओरड, भोंगा संजय राऊत, पण चौकशीचा आदेश जानेवारी महिन्यात उद्धव ठाकरेंनी यांनी दिलेत. चार महिन्यात ठाकरे साहेब काय झालं. 100 अधिकारी कामाला लावले, त्यात 100 पैशांचाही घोटाळा निघाला नाही. पूर्ण ठाकरे सरकार आणि माफिया सेना आमच्या मागे लागली होती. पण काहीही निघालं नाही, असंही किरीट सोमय्या यांनी सांगितलं आहे.

किरीट सोमय्या पुढे म्हणाले, शिवडी कोर्टाने आमचा हा दावा दाखल करून घेतला असून, यावर 26 मे रोजी सुनावणी होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना चांगला धडा शिकवण्यासाठी संजय राऊतांविरोधात याचिका केलीय, जेणेकरून शिक्षा त्यांच्या भोंग्याला होईल. तसेच उद्धव ठाकरेंनाही हा एक प्रकारचा इशारा असल्याचंही किरीट सोमय्यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.