घर महाराष्ट्र मीरा-भाईंदर: गोचीडाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे श्वान निर्बीजीकरण केंद्र बंद

मीरा-भाईंदर: गोचीडाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे श्वान निर्बीजीकरण केंद्र बंद

Subscribe

मीरा-भाईंदर महापालिकेच्या उत्तन येथील श्वान निर्बीजीकरण केंद्रावर गेल्या काही दिवसांपासून गोचीडांचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे निर्बीजीकरण केंद्र बंद ठेवण्यात आले आहे. या केंद्राचे निर्जंतुकीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे

भाईंदर :- मीरा-भाईंदर महापालिकेच्या उत्तन येथील श्वान निर्बीजीकरण केंद्रावर गेल्या काही दिवसांपासून गोचीडांचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे निर्बीजीकरण केंद्र बंद ठेवण्यात आले आहे. या केंद्राचे निर्जंतुकीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. (Meera Bhayandar Dog sterilization center closed due to increasing Gochida infestation)
मीरा- भाईंदर शहरातील भटक्या कुत्र्यांवर निर्बीजीकरण करण्यासाठी महापालिकेने भाईंदर पश्चिमेच्या उत्तन येथे निर्बीजीकरण केंद्र सुरू केलेले आहे. २००४ मध्ये श्वान निर्बीजीकरण सुरू करणारी मिरा-भाईंदर ही राज्यातील पहिली पालिका होती. गेल्या वर्षी या केंद्राची क्षमता वाढवल्यानंतर आता या केंद्रात एकाच वेळी शंभर श्वान ठेवण्याची सुविधा आहे. शहरातील रस्त्यावर फिरणारे भटके कुत्रे पकडून या केंद्रात त्यांच्यावर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केली जाते. कुत्रे पूर्णपणे बरे होईपर्यंत त्याची देखभाल याच केंद्रात केली जाते आणि त्यानंतर त्याला पुन्हा नेऊन सोडले जाते. शहरातील भटक्या कुत्र्यांवर निर्बीजीकरण करण्यात येत असल्यामुळे कुत्र्यांची संख्या कमी झाल्याचे सांगितले जाते.
परंतु आता पुन्हा केंद्र बंद असल्यामुळे ही संख्या वाढणार आहे. या केंद्रावर मोठ्या प्रमाणात गोचिडींचा प्रादूर्भाव झाला आहे. गोचीड हे श्वानांसाठी प्राणघातक ठरू शकतात. ज्या कुत्र्यांवर निर्बीजीकरण करण्यात आले होते त्या सर्वावर गोचीड औषध उपचार करून त्यांना बाहेर सोडण्यात आले. त्यानंतर केंद्राचे पूर्णपणे निर्जंतुकीकरण सुरू करण्यात आले आहे. कुत्र्याला गोचीडीची लागण झाल्यामुळे माणसांप्रमाणेच डेंगीसदृश ताप येतो. त्याचा थेट कुत्र्याच्या यकृतावर परिणाम होतो. त्यामुळे रक्तातील प्लेटलेट्स कमी होतात व आजार बळावल्यानंतर त्याचा मृत्यू होतो. गेल्या महिन्यातही हे केंद्र याच कारणासाठी दहा दिवस बंद ठेवण्यात आले होते. या महिन्यातही 10 ऑगस्टपासून हे केंद्र बंद आहे.
या केंद्रामध्ये गोचीडाचा प्रादूर्भाव झाल्यामुळे संपूर्ण केंद्रात मोठ्या दाबाने पाणी फवारून ते केंद्र स्वच्छ करण्यात आले आहे. केंद्रातील लोखंडी गज देखील फायर गनचा वापर करून जाळून काढले आहेत. संपूर्ण केंद्रात औषध फवारणी करून केंद्राचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. केंद्राचे पूर्ण निर्जंतुकीकरण होण्यासाठी केंद्र आणखी एक आठवडा बंद ठेवण्यात येणार आहे. -डॉ. विक्रम निराटले – पशू वैद्यकीय अधिकारी,  मीरा-भाईंदर महापालिका
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -