खेडमधील सभा विराट झाली पाहिजे; उद्धव ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटाकडून पहिली सभा घेण्यात येणार आहे. खेड येथे ही सभा घेण्यात येणार आहे.

meeting at Khed should be large; Uddhav Thackeray

शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिले. यामुळे ठाकरे गटाला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज दुपारी ३.३० वाजता सुनावणी करण्यात येणार आहे. पण येत्या ५ मार्चला ठाकरे गटाची पहिली सभा घेण्यात येणार आहे. खेड येथे ही सभा उद्धव ठाकरे यांच्याकडून घेण्यात येणार आहे.

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीबाहेर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ५ मार्चला खेडला आपली पहिली सभा घेण्यात येणार आहे. सर्व शिवसैनिकांना सांगा ही सभा विराट झाली पाहिजे. शिवसैनिकांनी सभेच्या तयारीला लागण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आले आहेत. तर कोकणातील सभा पाहून त्यांचे डोळे पांढरे झाले पाहिजे, असा टोला देखील ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला होता. आयोगाच्या निर्णयानंतर लगेच ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे गट आणि निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले होते. तर ठाकरे गटाचे प्रमुख प्रवक्ते संजय राऊत हे आजही शिंदे गटावर आणि निवडणूक आयोगावर आरोप करत आहेत.

हेही वाचा – पक्षाविरोधात मतदान करणे म्हणजे दुसऱ्या पक्षात सामील होण्याचा कट; सिब्बल यांचा आरोप

गेल्या काही दिवसात उद्धव ठाकरे यांच्या बैठकांमध्ये वाढ झाली आहे. उत्तर भारतीय समाजाची ठाकरे गटात वाढलेली इनकमिंग आणि या कार्यक्रमांना उद्धव ठाकरे स्वतः लावत असलेली हजेरी हे पाहता, उद्धव ठाकरे हे नव्या नावासह आणि नव्या चिन्हासह जोमाने कामाला लागल्याचेच दिसून येत आहे. तर उशिरा का असेना पण विजय हा सत्याचाच होणार असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, ५ तारखेला होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सभेकडे आता सगळ्यांचेच लक्ष लागून राहिलेले आहे.