नियोजनावर पाणी फेरत आमदार गेले कुणीकडे..?

पालकमंत्र्यांचे आदेश डावलून साहित्य संमेलनाच्या महत्त्वपूर्ण बैठकीकडे पाठ

नाशिक – कुसुमाग्रज नगरीत होणार्‍या सारस्वतांच्या मेळाव्याला अवघे काही दिवस शिल्लक असताना अखेर आता कुठे उद्घाटक निश्चित झाले. याच दिवशी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा संमेलनाध्यक्ष छगन भुजबळ यांनी नाशिकच्या आमदारांची बैठक आयोजित करून जबाबदारी वाटपाचे नियोजन केले. मात्र, ‘गेले आमदार कुणीकडे?’ असेच काहीसे घडले आणि पालकमंत्र्यांच्या नियोजनावर पाणी फेरले. मुख्य बाब म्हणजे शहरातीलच एका शाही विवाह सोहळ्यास सर्व आमदार आवर्जून उपस्थित असल्याचे दिसून आल्याने नाशिककरांसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या सारस्वतांच्या मेळाव्याप्रति कुणालाही सोयरसूतक नसल्याचे विदारक वास्तव अधोरेखित झाले.

नाशिककरांसाठी अभिमानाची बाब असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बिगूल वाजल्यापासून अनेकदा विघ्न आले. त्यात अगदी सुरुवातीपासूनच लोकप्रतिनिधींची उदासीनता दिसून आली आहे. मात्र, आता कुठे संमेलन उंबरठ्यावर येऊन ठेपले असताना त्यासाठीच्या नियोजन बैठकीलाच आमदारांनी दांडी मारल्याने पुन्हा एकदा या साहित्य मेळाव्याप्रतिची उदासीनता चर्चेचा विषय ठरली आहे. शनिवारी (दि. २०) साहित्य संमेलनाच्या मुख्य सभामंडपाचे भूमिपूजन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले. यानंतर लागलीच संमेलनाचे उद्घाटक आणि समारोपाचे मान्यवर यांची नावे निश्चित करण्यात आली. याच दिवशी पालकमंत्री भुजबळ यांनी जिल्ह्यातील आमदारांची बैठक नियोजित केली होती. यात साहित्य संमेलनासाठीच्या निधीविषयी, तसेच अन्य महत्त्वाच्या बाबींसंदर्भात नियोजन करण्यात येणार होते. अगोदरच दिवस कमी, त्यात सुरुवातीपासूनच संकटांचे अडथळे यामुळे संमेलनाच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात असताना आमदारांनी मात्र या बैठकीकडे पाठ फिरवत संमेलनासह संमेलनाध्यक्षांनाही महत्त्व दिले नाही. यातून पुन्हा एकदा स्थानिक आमदारांची या साहित्य संमेलनाप्रतिची उदासीनता अधोरेखित झाली.

एकीकडे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, खासदार हेमंत गोडसे यांसह जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी या महत्त्वपूर्ण कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवून या प्रतिष्ठेच्या मेळाव्याला प्राधान्य दिले. मात्र, आमदारांनी शहरातील एका आमदार कन्येच्या शाही विवाह सोहळ्यात विशेष उपस्थिती दर्शवत साहित्य संमेलन बैठककडे दुर्लक्ष केलेे. यामुळे संमेलन आयोजकांसह संमेलनाध्यक्ष भुजबळ यांच्या नियोजनावर मात्र पाणी फेरले गेले.

भुजबळांना एकटे पाडण्याचा डाव

मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये होणे ही बाब जिल्हावासीयांसाठी अतिशय भूषणावह आहे. हेच लक्षात घेत जिल्ह्यातील सर्व आमदारांना सोबत घेऊन संमेलन यशस्वी करण्याचे नियोजन स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी केले खरे; परंतु संमेलन नाशिकला घेण्यास मान्यता मिळाल्यापासूनच आमदारांनी असहकार्याची भूमिका घेतल्याचे दिसून येते. यातून भुजबळांना एकटे पाडण्याचा डाव रचला जात असून त्यातून भुजबळांच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसते. साहित्य संमेलनानिमित्त आमदारांकडून दिली जाणारी राजकारणाची फोडणी नाशिकच्या लौकिकाला शोभणारी आजिबातच नाही, असे बोलले जात आहे.