घरमहाराष्ट्रनाशिकबस सेवेसाठी पालिकेस अनुदान देण्यास राज्य शासनाचा नकार

बस सेवेसाठी पालिकेस अनुदान देण्यास राज्य शासनाचा नकार

Subscribe

विचार करुन निर्णय घेण्याचा एकनाथ शिंदेंसह भुजबळांचा आयुक्तांना सल्ला

महापालिकेने परिवहन सेवा चालविण्यास घेतल्यास वार्षिक 55 कोटी रुपयांचा तोटा होणार आहे. हा तोटा भरुन निघण्यासाठी राज्य शासनाने अनुदान द्यावे अशी मागणी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली. मात्र त्यास स्पष्ट शब्दात नकार देत नाशिकला अनुदान दिल्यास मुंबईसह पुणे, ठाणे या महापालिकाही अनुदानाची मागणी करतील. त्यापेक्षा महापालिकेनेच परिवहन सेवेचा पुनर्विचार करावा आणि अभ्यासाअंती निर्णय घ्यावा असा सल्ला उपस्थित मंत्र्यांनी दिला.

नाशिक महापालिका परिवहन विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत भुजबळ बोलत होते. यावेळी नाशिक महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे व अधिकारी उपस्थित होते. भुजबळ म्हणाले की, शहराचा विकास झालाच पाहिजे महापालिकेने परिवहन सेवेचा निर्णय घेताना अभ्यास करुन व सर्व बाबींचा सखोल विचार करुन घ्यावा. मुलभूत सुविधेसाठी साधारण 80 कोटी रुपये खर्च येणार आहे तसेच वार्षिक 55 कोटी रुपयांचा तोटा होणार आहे. ही वस्तुस्थिती महापालिकेच्या सर्व पदाधिकर्‍यांना निदर्शनास आणावी. यासाठी शासनाकडून अनुदानाची तरतूद नाही, असेही त्यांनी सांगितले. एकनाथ शिंदे म्हणाले, नाशिक शहराच्या बससेवेसाठी आवश्यक ते उत्पन्न मिळविण्यासाठी इतर महापालिकांच्या बससेवांचा अभ्यास करुन प्रस्ताव सादर करावेत. बससेवेसंबंधी लवकरच पुन्हा एकदा सविस्तर आढावा बैठक घेण्यात येईल. यावेळी नाशिक महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नाशिक शहर बससेवेसंबधी सादरीकरण केले. बस सेवेतून होणारा तोटा भरुन काढण्यासाठी राज्य शासनाकडून अनुदानाची मागणी यावेळी करण्यात आली. मात्र भुजबळ व शिंदे यांनी त्यास नकार दिला. मुंबईतील पालिकेची बेस्ट ही बससेवा कोट्यवधींचा तोटा सहन करीत आहे. त्यांना आर्थिक मदत दिलेली नाही. उद्या नाशिकला मदत दिली तर पुणे, ठाणे अशा सर्वच पालिका मागणी करतील. त्यामुळे आताच तोटा दिसत असेल तर मग व्यवस्थितपणे विचार करुन निर्णय घ्यावा असा सल्ला उपस्थित मंत्र्यांनी दिला. तिकीट वसुलीतून अपेक्षित उत्पन्न न मिळाल्यास जाहिरातीतून उत्पन्न भरून काढण्याकडे भुजबळ व शिंदे यांचे लक्ष वेधत त्यांनी मुंबईसारख्या ठिकाणी हे शक्य होत नाही तर नाशिकमध्ये काय होणार असा प्रश्न केला.

भाजप पदाधिकार्‍यांनी घेतली भुजबळांची भेट


नाशिक महापालिकेच्या विविध विषयांबाबत नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे तसेच पालकमंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी.महापौर सतीश कुलकर्णी, स्थायी समिती सभापती उद्धव निमसे, सभागृह नेते सतीश सोनवणे, गटनेते जगदीश पाटील यांनी चर्चा केली. यामध्ये नाशिक पालिकेच्या वतीने सुरू होणारी बस सेवा, कर्मचारी वर्गाचा आकृतीबंध मंजूर करणे, अधिकारी कर्मचारी यांना ७ वा वेतन आयोग लागू करणे, पाणी पुरवठ्याच्या विविध योजना सुरू करणे यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध व्हावा आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी भुजबळांनी सांगितले की, बससेवेला आपला विरोध नसून त्याचा निर्णय महापालिकेने घ्यावा. कर्मचार्‍यांना ७ वा वेतन आयोगाबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, तसेच मनपाचा आकृतीबंध मंजुरीसाठी असणार्‍या प्रस्तावाबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही देखील भुजबळांनी दिली.

बस सेवेसाठी पालिकेस अनुदान देण्यास राज्य शासनाचा नकार
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -