‘या’ रेल्वे मार्गावर आज दोन तासांचा इमरजन्सी ब्लॉक, पर्यायी मार्ग जाणून घ्या!

पालिकेच्या अधिकाऱ्यांना ही भिंत संरक्षित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी हार्बर मार्गावर थोड्याच वेळात दोन तासांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Mega blocks
मेगाब्लॉक

सोमवारपासून मुंबईत पावसाची तुफान बॅटिंग सुरू असून अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. त्यातच, आज सकाळी पिक अवर्सच्या काळात हार्बर मार्गावरील मस्जिद स्थानकाजवळ असलेल्या एका खासगी भिंतीचा भाग रुळांवर पडला. परिणामी हार्बर मार्गाचे वेळापत्रक कोलडमडले. सकाळी साडेसात वाजता ही वाहतूक सुरळीत करण्यात आली. मात्र, या भिंतीचा भाग पुन्हा कोसळू शकतो, त्यामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांना ही भिंत संरक्षित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी हार्बर मार्गावर दुपारी २ ते ४ या वेळात दोन तासांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. (Mega block on harbour railway route today)

मध्य रेल्वेने याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. भिंतीचा भाग रुळांवर कोसळल्याने रेल्वे सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे हार्बर मार्गावरचे वेळापत्रक कोलमडून पडले. सकाळी ७ वाजून १६ मिनिटांनी हा प्रकार घडला. मात्र, रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने उपाय करून रुळावरील डेब्रिज बाजूला सारून रेल्वे सेवा पूर्ववत केली. मात्र, या खासगी भिंतीचा भाग पुन्हा पावसाळ्यात कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना घडू नये याकरता मुंबई पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना ही भिंत सुरक्षित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार, पालिकेकडून लवकरच कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे हार्बर मार्गावर दोन तासांचा इमरजन्सी ब्लॉक घेण्यात येणार आहे.

दुपारी २ ते ४ वाजण्याच्या दरम्यान हा ब्लॉक असणार आहे. या काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वडाळा रोड मार्गावरील रेल्वे सेवा बंद असणार असल्याची माहितीही मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.


पर्यायी मार्ग काय

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वडाळा रोड मार्ग बंद असल्याने प्रवासी मध्य रेल्वे मार्गावरील दादर आणि कुर्ला मार्गाने प्रवास करू शकतात. तुम्हाला वडाळ्याला पोहोचायचं असेल तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून ठाण्याच्या दिशेने जाणारी ट्रेन पकडून कुर्लापर्यंत पोहोचू शकता. तिथून तुम्हाला वडाळ्याला जाण्यासाठी हार्बर मार्गावर ट्रेन उपलब्ध असतील, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.