घरमहाराष्ट्रनाशिकएमपीएससीद्वारे वर्षभरात ७,५६० जागांची मेगाभरती

एमपीएससीद्वारे वर्षभरात ७,५६० जागांची मेगाभरती

Subscribe

नवीन वर्षात विद्यार्थ्यांना मोठ्या संधी उपलब्ध

नाशिक :   कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर आता आयोगातर्फे स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले जात आहे. राज्य शासनाच्या विविध विभागांतील पदभरतीकरिता आयोगाकडे 31 डिसेंबर 2021 पर्यंत गट- अ, गट- ब, गट- क या संवर्गातील 7 हजार 560 जागांच्या पदभरतीसाठी मागणीपत्र दाखल झाले आहे. त्यातील 4 हजार 327 पदभरतीसाठी जाहीरातीही प्रसिद्ध झाल्या असून आता उर्वरित 3 हजार 233 जागांसाठी 2022 या वर्षात जाहीराती प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.

एमपीएससीतर्फे होणार्‍या या मेगा भरतीचा फायदा अनेक दिवसांपासून तयारी करणार्‍या उमेदवारांना होणार आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पदभरतीसाठीच्या अनेक परीक्षा विहित वेळेत होऊ शकल्या नाहीत. राज्य शासनाच्या मागणीपत्रानुसार गट- अ च्या 3 हजार 11 तर गट ब च्या 2658 आणि गट क च्या 1811 अशा एकूण 7 हजार 560 प्राप्त पदसंख्या असून त्यातील गट- अ च्या 1499, गट- ब च्या 1245 तर गट-क च्या 1583 अशा एकूण 4 हजार 327 पदांच्या भरतीसाठी जाहीराती प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यातील काही पदांच्या भरतीसाठी परीक्षाही झाल्या असून आता मागणीपत्रांपैकी जाहीरात प्रसिद्ध झालेली पदे वगळून इतर संवर्ग, पदांकरिता आवश्यक बाबींची पूर्तता करून लवकरच जाहीराती प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यामुळे नवीन वर्षात विद्यार्थ्यांना मोठ्या संधी उपलब्ध होतील.

- Advertisement -

या संवर्गातील पदांसाठी होणार मेगाभरती

सार्वजनिक आरोग्य विभाग (936), कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग (924), उद्योग उर्जा व कामगार विभाग (199), अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग (62), पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग (16), सामान्य प्रशासन विभाग (1057), मराठी भाषा विभाग (21), आदिवासी विकास विभाग (7), बृहन्मुंबई महापालिका (21), बांधकाम विभाग (13), पर्यावरण विभाग (3), गृह विभाग (1159), वित्त विभाग (321), वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग (1572), उच्च व तंत्रशिक्षण (35), शालेय शिक्षण व क्रीडा विभाग (105), सहकार, पणन व वस्त्रोद्योग (32), कौशल्य विकास व उद्योजकता (171), महसूल व वनविभाग (104) यांसह ग्रामविकास, नगरविकास, जलसंपदा, विधी व न्याय व नियोजन विभाग या संवर्गातील पदांसाठी भरती होणार आहे.

नवीन वर्षात अनेक संधी
अनेक महिन्यांपासून स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या उमेदवारांसाठी नवीन वर्षात विविध संवर्गातील पदांच्या भरतीसाठी परीक्षा होणार असल्याने संधी उपलब्ध होणार आहे. उमेदवारांनी आतापासून या परीक्षांच्यादृष्टीने नियमित अभ्यास केल्यास यश मिळू शकेल.

     – प्रा. राम खैरनार, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, युनिर्व्हसल फाउंडेशन

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -