घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रयात्रेच्या आठवणी : पाळण्यात बसण्याची विशेष हौस; चक्रीचीही मजा काही औरच !

यात्रेच्या आठवणी : पाळण्यात बसण्याची विशेष हौस; चक्रीचीही मजा काही औरच !

Subscribe

नाशिक : गावातील सर्वात ‘डेअरिंगबाज’ माणसं कोण? तर यात्रेतील पाळण्याची मजा डोळे बंद न करता घेतात ते.. एकेकाळची धारिष्ठ्याची ही व्याख्या. यात्रा म्हटले की, रहाट पाळणे वा आकाश पाळण्यांच्या स्मृती डोळ्यांसमोरुन गरगर फिरू लागतात. मोठ्यांसाठी आकाश भेदणारे पाळणे तर लहानग्यांसाठी छोट्याखानी चक्री. मात्र, वेगवेगळ्या शहरांत उभारण्यात आलेल्या अ‍ॅम्युझमेंट पार्कने यात्रेतील पाळण्यांचे विश्वच बदलले. या पार्कमध्ये अधिक मनोरंजक, चित्तथरारक व आकर्षक पाळणे आले आणि त्यातून यात्रेतील पाळण्यांचा भाव कमी झाला. आज ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पाळणेवाले अक्षरश: रिकामे पाळणे फिरवताना दिसतात. परंतु, तरीही ग्राहकवर्ग पाळण्यात बसायला तयार होत नाही. त्यामुळे पाळणेही काही वर्षांत यात्रेतून नामशेष होतात, की काय अशी शंका यात्राप्रेमींच्या मनात येत आहे.

प्रत्येक गावाच्या यात्रेत वैविध्यपूर्ण रहाट पाळणे पाहायला मिळायचे. आज आकाश पाळण्यांची उंची कमालीची वाढली आहे. मात्र, पूर्वी जे पाळणे असायचे त्यांच्यासमोर गगनही ठेंगणे वाटायचे. या पाळण्यात बसण्यापूर्वी प्रत्येकाच्या मनात काही क्षण धस्स व्हायचे. पाळण्याचे तिकीट तर काढलेले असायचे. पण आता जीव धोक्यात घालण्याची मजा कशी लुटायची असाही प्रश्न त्यांच्यासमोर असायचा. अशातच एखाद्याला पाळण्यात बसण्यापूर्वीच चक्कर यायची व त्याचेच निमित्त काढत तो या जीवघेण्या मजेपासून ‘मुक्त’ व्हायचा. पाळण्यात बसण्यापासूनच कसरत असायची. पाळण्यात बसताना तो इतका हलायचा की, येथेच आपण भुईसपाट होऊ अशी भीती काही क्षणासाठी वाटायची. पाळण्यात बसल्यावर सिटबेल्टप्रमाणे सुरक्षिततेचा दांडा भेदरलेल्या मनांना काहीसा रिलॅक्स करायचा. पण हा दांडा कडीत व्यवस्थित बसला आहे की नाही याची प्रत्येकजण चार-पाच वेळा तपासणी करुन घ्यायचा. पाळणा फिरायला लागायचा तसा एकच जल्लोष व्हायचा. कुणी गणपती बाप्पाचा जयघोष करायचे, तर कुणी एकमेकांच्या नावांचा उल्लेख करुन ओरडायचे.

- Advertisement -

पाळण्याची गती जसजशी वाढायची तसतसा आवाज कमी कमी होत जायचा. पाळणा खालून वर जाताना अनेकांच्या पोटात गलबलून जायचे. सर्वात वरच्या भागावर गेल्यावर संपूर्ण शहराचा नजारा बघायला मिळायचा. पण या नजार्‍याचा आनंद घेण्यासारखी मनस्थिती नसायची. पाळणा पूर्णत: गतीमान झाल्यावर मात्र अनेकांची पाचावर धारण बसायची. अशा वेळी कोणी डोळे मिटून राम रक्षा म्हणायचे तर कुणी मारुती स्तोत्र.. कुणी रामाचा धावा करायचे तर कुणी दत्ताचा.. पाळण्याची गती कमी कमी होऊ लागली की मग जीवात जीव यायचा… पाळण्यातून उतरल्यावर कुणी डोक्याला हात लावून खाली बसून घ्यायचे तर कुणी मळमळत असल्याने मलून चेहरा करुन उर्वरित यात्रा ‘उरकवायचे’. पण कितीही भीती वाटली तरी ज्या-ज्या वेळी पाळणा दिसेल त्या-त्या वेळी प्रत्येकाची पावले पाळणा तिकीट खिडकीकडे वळायची हे मात्र तितकेच खरे. १९८० च्या दशकापर्यंत विजेचा वापर पाळण्यांत होत नव्हता.

दोन व्यक्ती अक्षरश: पाळण्यांच्या दांड्यांवर उभे राहून तो सायकल प्रमाणे पुढे ढकलायचे. या पाळणा चालवणार्‍यांच्या हिंमतीलाही लोक मनसोक्तपणे दाद द्यायचे. एकदा का वेग पकडला की मग तो चक्री सोडायचा. कालांतराने या चक्रीतील प्राण्यांची जागा प्लास्टिकच्या गाड्यांनी घेतली.

- Advertisement -
लहानग्यांसाठी प्राण्यांच्या प्रतिकृतींचे आकर्षण

मोठ्यांसाठी चार ते पाच प्रकारांतील उंचीचे आकाश पाळणे असायचे. तर लहानग्यांसाठी लाकडी चक्री असायची. या चक्रीत लोखंडी दांड्यांना वाघ, सिंह, हत्ती, घोडे, उंट अशा प्राण्यांच्या लाकडी प्रतिकृती टांगलेल्या असायच्या. त्या प्रतिकृतींवर स्वार होऊन चक्रीची मजा लुटली जायची. येथेही चक्री हातानेच फिरवली जायची. त्यासाठी चक्रीवाला जीवाचे रान करत ती ओढत पळायचा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -