मान्सून दोन दिवसात अरबी समुद्रात दाखल होणार, हवामान विभागाचा अंदाज

दोन दिवसांपूर्वी अंदमानमध्ये मान्सून पोहोचला आहे. मान्सूनच्या प्रवासासाठी अनुकूल वातावरण असून पुढील दोन दिवसात मान्सून अरबी समुद्रात दाखल होणार आहे. या वर्षी सहा दिवस आधी मान्सूनचे वारे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे राज्यांत काही भागात जोरदार पूर्वमोसमी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 7 जून ते 8 जूनपर्यंत मान्सून सुरू होऊ शकतो. तर 12 जून ते 15 जून पर्यंत संपूर्ण राज्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा महाराष्ट्रात मान्सून दरवर्षीप्रमाणे पोहोचण्याची शक्यता आहे. अंदमानमध्ये 16 मेपर्यंत पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान विभागाचे पुणे येथील प्रमुख अनुराग कश्यपी यांनी सांगितले

मान्सून पूर्व पावसाची शक्यता –

राज्यात विविध भागाता मान्सून पूर्व पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान 19 ते 21 मे या कालावधीत उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी हिंगोली नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात 19 ते 21मे दरम्यान विजांच्या कडकडाट वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आङे. तर अकोला, यवतमाळ, वाशीम आणि अमरावती जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.