घरCORONA UPDATEशिक्षंकासाठी खुशखबर; मार्च महिन्याचे वेतन वेळेवर होणार

शिक्षंकासाठी खुशखबर; मार्च महिन्याचे वेतन वेळेवर होणार

Subscribe

करोनामुळे वेतन वेळेवर होण्याबाबत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम होता. मात्र शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांचे वेतन हे उणे प्राधिकार पत्रातून काढण्याच्या सूचना दिल्याने मार्चचे वेतन वेळेवर होणार आहे. त्यामुळे शिक्षकांना दिलासा मिळणार आहे. राज्यातील शाळांमधील शिक्षकांचे मार्चचे वेतन हे रक्कम कमी पडत असल्याने उशिरा होण्याची शक्यता होती. मात्र शालेय शिक्षण विभागाने राज्याच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना उणे प्राधिकार पत्राने (बिडीएस) वेतन काढण्याची परवानगी देत तशा सूचना वेतन अधीक्षकांनाही दिल्याने मार्चचे वेतन वेळेवर होईल. याबाबत शालेय शिक्षण उपसचिवांनी गुरुवारी सूचना दिल्या आहेत. यामध्ये केवळ नियमित वेतन दिले जाणार असून कोणतेही थकबाकीची देयके दिली जाणार नाही असेही स्पष्ट केले आहे.

प्रत्येक वर्षी मार्चमध्ये निधी अभावी वेतन उशिरा होत असते अशावेळी उणे प्राधिकार पत्राचा वापर करून वेतन देण्याच्या सूचना कोषागाराना केल्या जातात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेतन वेळेवर होणार की नाही या चिंतेत राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी होते. आता तातडीने राज्यातील शिक्षणाधिकारी व वेतन पथक अधीक्षकांनी तातडीने कार्यवाही करणे अपेक्षित आहे जेणे करून १ तारखेला शिक्षकांच्या खात्यात वेतन जमा होईल अशी भावना शिक्षकांमध्ये आहे.

- Advertisement -

एक दिवसीय राज्यस्तरीय परिषदेचे व्हर्च्युअल पद्धतीने आयोजन

देशासह राज्यात करोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संकटकालिन परिस्थीतीत विद्यापीठ तसेच सलंग्नित महाविद्यालयातील नियोजीत कार्यक्रम, परिषदा, चर्चासत्रे पुढे ढकलण्याच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. तसेच करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत अधिसूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. या परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेता मुंबई विद्यापीठाचे तळेरे येथील विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयातील पुर्वनियोजित एक दिवसीय राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन मात्र वेगळ्या पद्धतीने होत आहे. यासाठी महाविद्यालयाने झूम एप्लीकेशनच्या माध्यमातून ही परिषद आभासी पद्धतीने घ्यावयाचे ठरविले आहे.

२९ मार्च २०२० रोजी ही परिषद आयोजित केली जाणार असून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. उदय सामंत, वॉटरमॅन ऑफ इंडिया श्री राजेंद्र सिंग, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर हे आभासी पद्धतीने या एक दिवसीय राज्यस्तरीय परिषदेचे उदघाटन करणार आहेत. दरवर्षी आयोजित होणाऱ्या ‘विश्वनाथ समिट’ या उपक्रमाअंतर्गत आयोजित होत असलेल्या या परिषदेची ‘मॅनेजमेंट ऑफ एक्वेटीक हेल्थ अँड रिसॉर्सेस ऑफ कोकण विथ स्पेशल एम्फेसिस ऑन सिंधुदूर्ग’ ही संकल्पना आहे.

- Advertisement -

राज्यातील जवळपास पन्नासहून अधिक प्राध्यापक, विशेतज्ज्ञ या परिषदेत आभासी पद्धतीने संशोधनपर सादरीकरण करणार आहेत. परिषदेतील मार्गदर्शक, संशोधक, सहभागी व्यक्तिंना तंत्रज्ञानाच्या मदतीने व झूम एप्लीकेशनच्या सहाय्याने प्रशिक्षित करण्यात आले असल्याचे ऑर्गनायझिंग समितीचे अध्यक्ष प्रा. विनायक दळवी यांनी सांगितले.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -