दादरमध्ये म्हाडाची घरे विक्रीसाठी… म्हाडाकडून झाला ‘हा’ खुलासा  

Registration of lottery application for 5647 flats of Pune MHADA starts from tomorrow
पुणे म्हाडाच्या ५६४७ सदनिकांच्या सोडती अर्ज नोंदणीला उद्यापासून प्रारंभ
तुम्हाला म्हाडाचे घर हवे असल्यास पेटीएमवर अथवा पोस्टाच्या या खात्यावर पैसे पाठवा’ असे सांगून लोकांची फसवणूक करण्यात येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. म्हाडाच्या वतीने अशा प्रकारे कुठल्याही स्वरुपाची पैशाचे व्यवहार केले जात नाहीत तसेच म्हाडाने या कामाकरीता कुठल्याही प्रतिनिधीची नेमणूक केली नाही, असा खुलासा म्हाडाच्या वतीने करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर काही संदेश फिरत असल्याचे म्हाडा प्रशासनाच्या लक्षात आले आहे. या संदेशामध्ये दादर परिसरात म्हाडाची घरे विक्रीस उपलब्ध असल्याची बतावणी करुन नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्यात येत आहे. या संदेशासोबतच काही लोकांना थेट संपर्क करुन देखील अशा पध्दतीने म्हाडाची घरे विकत असल्याचा बनाव केला जातो व त्याकरीता  या व्यक्ती “पेटीएम ” वरून अथवा “कॉर्पोरेट सेंट्रल कॉलेक्टिव हब म्हाडा”  या नावाने इंडियन पोस्ट बँकेच्या खात्यावर पैसे मागवीत आहेत.
म्हाडा ही संस्था सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची संस्था असून गेल्या ७० वर्षांपासून नागरिकांचे गृहस्वप्न साकारण्याचे काम करीत आहे. म्हाडातर्फे बांधण्यात आलेल्या सदनिका या जाहीर संगणकीय सोडत प्रक्रियेद्वारे वितरित केल्या जातात. त्याकरीता विक्रीस उपलब्ध असलेल्या सदनिकांची जाहिरात नागरिकांच्या माहितीसाठी वर्तमान पत्रांतून प्रसिद्ध करण्यात येते. म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर सदनिका विक्रीचे अर्ज नागरिकांकडून मागविले जातात आणि अर्जाची रक्कम व अनामत रक्कम म्हाडाने जाहिरातीत नमूद बँकेतच जमा केली जाते. या सर्व प्रक्रियेनंतर सदनिकांची जाहीर संगणकीय सोडत काढण्यात येते. ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पध्दतीने राबविण्यात येते.
करिता सदरील प्रसिद्धी पत्रकाद्वारे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, अशा प्रकारे नागरिकांनी कोणत्याही मध्यस्थांच्या/दलालांच्या/व्यक्तींच्या आश्वासनांना /भूल थापांवर विश्वास ठेवू नये. अशा प्रकारच्या कुठल्याही प्रलोभनांना बळी न पडता म्हाडाच्या पारदर्शक संगणकीय सोडत प्रणालीवर आधारित प्रक्रियेतच सहभाग घ्यावा. म्हाडाच्या सदनिकांचे वितरण हे केवळ संगणकीय सोडत प्रणालीच्याच माध्यमातून करण्यात येत असते. भविष्यातही हीच कार्यप्रणाली कार्यरत राहणार असून याकरिता कोणत्याही मध्यस्थांची, दलालांची नियुक्ती करण्यात आलेली नाही.
अशा प्रकारच्या व्यवहारांमध्ये सहभागी झाल्यामुळे फसगत झाल्यास म्हाडा प्रशासन जबाबदार  राहणार नाही, असे म्हाडाच्या वतीने कळविण्यात येत आहे. तुमची अशाप्रकारे फसवणूक होत असल्याची माहिती म्हाडाच्या मुख्य दक्षता व सुरक्षा विभागास पुढील पत्त्यावर कळवावी. मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी, गृहनिर्माण भवन, चौथा मजला, कला नगर, वांद्रे पूर्व, मुंबई -५१. दूरध्वनी क्रमांक – ०२२-६६४०५४४५, ०२२-६६४०५४४६