MHADA Konkan Lottery 2021: ८ हजार ९८४ घरांची सोडत पार; काही ठिकाणी हसू, काही ठिकाणी आसू

MHADA Konkan board Lottery 2021 result
MHADA Konkan Lottery 2021: ८ हजार ९८४ घरांची सोडत पार; काही ठिकाणी हसू, काही ठिकाणी आसू

म्हाडाच्या ८ हजार ९ सदनिकांसाठी २ लाखांपेक्षा अधिक अर्ज येतात ही अभिमानाची गोष्ट असून लोकांना घराची किती गरज आहे हे यावरून अधोरेखित झाले आहे. म्हाडाने आपली विश्वासहर्ता सिद्ध केल्यामुळेच म्हाडाच्या या घरांना एवढा मोठा प्रतिसाद आला. ‘गाव तेथे म्हाडा’ ही संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील कृती आराखडा देखील तयार करण्यात आल्याची घोषणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी ठाण्यात केली आहे. ही संकल्पनेची लवकरच अंमलबजावणी केली जाईल असेही ते म्हणाले.

ठाणे महापालिकेच्या डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये गुरुवारी कोकण गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळातर्फे कल्याण आणि (म्हाडाचा घटक) मिरा रोड, विरार, नवी मुंबई, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यातील विविध गृहप्रकल्पांतर्गत उभारलेल्या ८ हजार ९८४ सदनिकांच्या विक्रीकरिता प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत ठाण्यात प्रथमच पार पडली. ही संगणकीय सोडत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, आमदार रवींद्र फाटक, मुंबई इमारत पुनर्वसन मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर, म्हाडाचे मुख्याधिकारी डॉ. नितीन महाजन उपस्थित होते.

या कार्यक्रमात आव्हाड यांनी म्हाडाच्या कामाचे कौतुक करत आज जो काही प्रतिसाद मिळाला आहे, त्यामुळे लोकांना घराची किती गरज आहे, हे समजले. त्यामुळे भविष्यात निश्चितच आव्हान असणार असल्याचेही त्यांनी सांगितले. म्हाडाच्या माध्यमातून महाड येथे उध्दवस्त झालेल्या गावांच्या ठिकाणी ६०० चौरस फुटांची २६१ घरे उभारण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. मागील २५ वर्षे रखडलेला बीडीडी चाळीची पुनर्विकासही आता खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे. ठाण्यातील वर्तकनगर भागात म्हाडाच्या माध्यमातून १२०० घरे उपलब्ध होणार आहेत. त्यातील ४०० घरे ५०० चौरस फुटांची असून ती पोलिसांसाठी असणार आहेत. उर्वरीत घरांची लॉटरी काढली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय नवीमुंबईत आयटी सेक्टर वाढत आहे, त्याठिकाणी झोपडपट्ट्या देखील अधिक आहेत. परंतु आता एसआरए योजनेचा विस्तार हा ठाणे जिल्ह्यात झालेला आहे. त्यामुळे नवीमुंबईत झोपडपटटींचा पुनर्विकास करून त्याच ठिकाणी आयटी सेक्टरलाही जागा उपलब्ध करुन दिल्यास नागरीकांना घराजवळच नोकरीच्या संधी देखील उपलब्ध होतील, त्यामुळे यावर विचार करावा अशा सुचनाही त्यांनी यावेळी संबधींत विभागाला दिल्या. मोतीलाल नगर येथील १४६ एकरचा भुखंड उपलब्ध झालेला आहे, त्याठिकाणी देखील विकास करणो शक्य होणार आहे. वरळी येथील पत्राचाळीचा पुनर्विकासही आता सुरु झाला असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सिडको प्रमाणे म्हाडानेही क्लस्टरमध्ये सहभागी व्हावे –  एकनाथ शिंदे

८ हजार घरांसाठी २ लाखांपेक्षा अधिक अर्ज येतात यावरूनच म्हाडाच्या घरांची मागणी किती आहे हे स्पष्ट होत असून जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या टीमचे हे काम कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुंब्रा, दिवा तसेच वागळे पट्ट्यात घरे पडून दुर्घटना होऊ नये यासाठी आम्ही देवाकडे हात जोडून सतत प्रार्थना करत असतो. त्यामुळेच क्लस्टर सारखी महत्वाकांक्षी योजना राबवण्यात येत असून सिडको प्रमाणे म्हाडाने देखील क्लस्टर मधील युआरपीचा विकास करून या योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी एकनाथ शिंदे यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना केले. कोरोना काळात राज्याच्या उत्पन्नावर परिणाम झाला असला तरी, राज्य सरकारने विकास थांबवला नाही. समृद्धी महामार्ग येत्या डिसेंबर २०२१ पर्यंत शिर्डीपर्यंत पोचला असेल आणि पुढच्या टप्प्यात मार्गी लागेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. शहरांचा समान विकास व्हावा यासाठी यूनिफाईड डीसीआरमध्ये बदल करण्याचा क्रांतिकारी निर्णय देखील नागरविकस खात्याने घेतला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

नाट्यगृहातील वातावरण शांतच

म्हाडांच्या घरांची सोडत ऑनलाईन असल्याने प्रवेशिकेशी आता सोडण्यात येत नव्हते. त्यामुळे मोजून नागरिक नाट्यगृहात आल्याने तेथील वातावरण बऱ्यापैकी शांत होते. एकीकडे लॉटरी काढली जात होती. पण, सोडत ऑनलाईन पध्दतीने असल्याने नागरिकांनी घरूनच ती सोडत पाहणे पसंत केले. त्यामुळे विजेत्यांचा जल्लोष यावेळी पाहण्यास मिळाला नाही.

३२ देशातून सोडतीकडे लक्ष

म्हाडांच्या घरांचीसोडत असल्याने या सोडतीकडे तब्बल ३२ देशांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. सुरुवातील ३२ हजार नागरिक होते, ती संख्या कालांतराने म्हणजे १२ वाजेपर्यंत ८५ हजारांच्या घरात पोहोचली होती.

या जिल्ह्याने नोकरीपाठोपाठ घरी दिले

मूळ धुळे येथील राहिवासी असलेले संतोष गायकवाड हे शहर पोलीस दलात असून सद्यस्थितीत ते कासारवडवली येथे कार्यान्वित आहे. त्यांना म्हाडाच्या घराची लॉटरी लागली आहे. ठाणे जिल्ह्याने त्यांना जशी नोकरी दिली तसेच घर ही दिले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आई वडिलांसह कुटुंबाला राहण्यासाठी हक्काचे घर मिळाले आहे. हे घर लागल्याने खूप आनंद होत असून तो शब्दात सांगता येत नाही.

नशीब लागते याची प्रचिती

भाड्याने राहणाऱ्या घरापासून पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी म्हाडाच्या घराची लॉटरी लागल्याने खूप आनंद झाला आहे. पहिल्यांदाच अर्ज करताना यावेळी १० ते १२ मित्रांनीही अर्ज केला होता. तर या लॉटरीसाठी आलेले अर्ज पाहून खरोखरच यासाठी नशीब लागते याची प्रचिती आली. म्हाडाची लॉटरीमध्ये पारदर्शकता असल्याचे रवी शिंदे यांनी सांगितले.

लॉटरी मध्ये पारदर्शकता

म्हाडाच्या घरासाठी चार वेळा अर्ज केला होता. अखेर आज ते स्वप्न पूर्ण झाल्याने खूप आनंद झाला आहे. तसेच म्हाडाच्या लॉटरी पद्धतीत खरोखरच पारदर्शकता आहे. असे घराची लॉटरी लागणाऱ्या अजित किटकर यांनी सांगितले.

यादीत नाव दिल्याने भोसले धावले स्टेजवर

लॉटरी सुरू झाल्यानंतर पाच ते सहा राउंड झाले, नेतेमंडळी गेले तरी घराची लॉटरी लागणारे कोणीही पुढे येत नव्हते. त्यामुळे घराची लॉटरी लागलेल्या आणि यादीत नाव असलेल्या मंडळींनी स्टेजवर यावे, यासाठी वारंवार आवाहन केले जात होते. याचदरम्यान डी.जी.भोसले हे घराची लॉटरी लागली या आनंदाने उठून स्टेज कडे धावले. त्यांना छायाचित्रकारांनी घेरले. फोटो क्लिक सुरू झाले. स्टेजवर गेल्यावर त्यांचे नाव प्रतीक्षा यादी असल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांना अजून काही दिवस तरी घरासाठी प्रतिक्षाच करावी लागणार आहे.

पहिली सोडत ठरली शंभर नंबरी

सोडतीचा शुभारंभ गृहनिर्माण मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते झाला. पहिली सोडत शंभर घरांची काढण्यात आली. तर या सोडतीच्या नाहीतर संपूर्ण सोडतीच्या रचना चांदोरकर या पहिल्याच विजेत्या ठरल्या आहेत. पहिली सोडत कल्याणच्या शिरधोन येथील काढण्यात आली. त्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राजमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते घरांच्या सोडती पार पडल्या.