मुंबई : कोकण मंडळाने ठाणे शहर व जिल्हा, रायगड, सिंधुदुर्गमधील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारलेल्या सदनिका व भूखंड विक्रीच्या सोडतीसाठी अर्ज भरणा प्रक्रियेला 11 ऑक्टोबर, 2024 रोजी सुरुवात केली होती. 6 जानेवारी 2025 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत कोकण मंडळाच्या 2147 सदनिका आणि 110 भूखंड विक्रीकरिता सुमारे 24,911 अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले आहेत. यानंतर आता संगणकीय सोडतीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. (MHADA Konkan Board lottery on 5th February 2025)
कोकण मंडळाने ठाणे शहर व जिल्हा, रायगड, सिंधुदुर्गमधील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारलेल्या सदनिका आणि भूखंड विक्रीच्या सोडतीसाठी अर्ज भरणा प्रक्रियेला 11 ऑक्टोबर 2024 रोजी सुरुवात केली होती. सदनिका आणि भूखंडसाठी कोकण मंडळाने 6 जानेवारी 2025 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्जदारांना अर्ज सादर करण्याची मुदत दिली होती. यानंतर 7 जानेवारी 2025 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत अनामत रकमेचा भरणा ऑनलाइन व संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS/NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा करण्याची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार, कोकण मंडळाच्या 2147 सदनिका आणि 110 भूखंड विक्रीकरिता सुमारे 24,911 अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले.
हेही वाचा – Coastal Road : कोस्टल रोड आणि वरळी-वांद्रे सी लिंक जोडणारा उत्तर वाहिनी पूल वाहतुकीसाठी होणार खुला
सोडतीसाठी पात्र अर्जांची प्रारूप यादी 20 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. या प्रारुप यादीवर अर्जदारांना 22 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आपले दावे आणि हरकती नोंदविण्यासाठी मुदत देण्यात आली होती. यानंतर आज (24 जानेवारी 2025) सायंकाळी 6 वाजता सोडतीत सहभाग होणाऱ्या अर्जांची अंतिम यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली.
म्हाडा कोकण मंडळाची सोडत कधी?
दरम्यान, येत्या 5 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 1 वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे येथील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात संगणकीय सोडत आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी आज दिली. त्यांनी असेही सांगितले की, सोडतीच्या दिवशी अर्जदारांना सोडतीचा निकाल तात्काळ मोबाईलवर एसएमएस द्वारे, ई-मेल द्वारे तसेच सोडत अॅपवर प्राप्त होणार आहे.