म्हाडाच्या ८ हजार ९८४ घरांची लॉटरी; २४ ऑगस्टपासून ऑनलाईन नोंदणी

म्हाडाच्या कोंकण मंडळातर्फे ८ हजार ९८४ सदनिका विक्रीसाठी सोडत

mhada office

कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक)  कल्याण, मीरा रोड, विरार, नवी मुंबई, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यातील विविध गृहप्रकल्पांतर्गत ८ हजार ९८४ घरांच्या विक्रीकरिता २३ ऑगस्ट २०२१ पासून लॉटरी (Mhada Lottery 2021) जाहीर करण्यात येत असून ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचा शुभारंभ राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते मंगळवार २४ ऑगस्ट २०२१ रोजी  ‘गो-लाईव्ह’ कार्यक्रमांतर्गत करण्यात येणार आहे.

वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात आयोजित ‘गो-लाईव्ह’ कार्यक्रमाला गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन महाजन, म्हाडाचे वित्त नियंत्रक विकास देसाई आदी उपस्थित राहणार आहेत.

अर्जदारांना सोडतीत सहभाग घेण्याकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी करणे क्रमप्राप्त राहील व अर्ज नोंदणीची सुरवात २४ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी १२ वाजेपासून होणार आहे. नोंदणीकृत अर्जदार २४ ऑगस्ट २०२१ रोजीच दुपारी ३ वाजेपासून आपल्या ऐच्छिक सदनिकेकरिता ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरवात करू शकतील. इच्छूक अर्जदार २२ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करू शकतील आणि ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा शेवटचा तारीख आणि वेळ – २३ सप्टेंबर, २०२१ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत असणार आहे. तसेच अनामत रक्कमेच्या ऑनलाईन स्विकृतीकरिता अंतिम तारीख आणि वेळ २४ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत असणार आहे आणि ऑनलाईन बँकेत RTGS / NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा २४ सप्टेंबर, २०२१ रात्री ११. ५९ वाजेपर्यंत अर्जदारांना करता येणार आहे.

कोकण मंडळाच्या सोडतीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) अंतर्गत ६ हजार १८० सदनिका सोडतीत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी शिरढोण (ता. कल्याण, जि. ठाणे) येथे ६२४ सदनिका, खोणी (ता. कल्याण, जि. ठाणे) येथे ५८६ सदनिका, सर्व्हे क्रमांक १६२ खोणी (ता. कल्याण, जि. ठाणे) येथे २०१६ सदनिका, सर्व्हे क्रमांक १३ भंडारली (ता. जि. ठाणे) येथे १७६९ सदनिका, गोठेघर (जि. ठाणे) येथे ११८५ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.

तसेच म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी मिरारोड (ठाणे) १५ सदनिका सोडतीत आहेत.  अल्प उत्पन्न गटासाठी विरार बोळींज येथील १ हजार ७४२ सदनिका, सर्व्हे क्रमांक १३ भंडारली (ता. जि. ठाणे) येथील ८८ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. मध्यम उत्पन्न गटासाठी विरार बोळींज येथे ३६ सदनिका, वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथे २ सदनिका, सर्व्हे क्रमांक २१६ पीटी, २२१ पीटी मिरा रोड (जि. ठाणे) येथे १९६ सदनिका सोडतीत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उच्च उत्पन्न गटासाठी सर्व्हे क्रमांक ४९१, २३ पार्ट वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथे १ सदनिका सोडतीत आहे.

याशिवाय २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी चंदनसर (ता. वसई, जि. पालघर) येथे ८, वडवली (मोघरपाडा, ठाणे) येथे ७६ सदनिका, मौजे कावेसर आनंद नगर (ता. जि. ठाणे) येथे २३ सदनिका, गाव वालिव (ता. वसई, जि. पालघर) १६ सदनिका, कोपरी (ता वसई, जि. पालघर) येथे २ सदनिका सोडतीत विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  अल्प उत्पन्न गटासाठी कासारवडवली (ता. जि. ठाणे) येथे १६ सदनिका, मौजे वडवली (ता. जि. ठाणे) येथे ११६ सदनिका, मोघरपाडा (ठाणे पश्चिम) येथे १ सदनिका, मौजे पारसिक नगर (ता. जि. ठाणे) येथे ३५ सदनिका, मौजे डावले (ता. जि. ठाणे) येथे २८ सदनिका, मौजे कावेसर (ता. जि. ठाणे) येथे १४० सदनिका, बालकुंभ- ठाणे येथे २१ सदनिका, भाईंदरपाडा-ठाणे येथे २४ सदनिका, अगासन-ठाणे येथे ४७ सदनिका, टिटवाळा (ता. कल्याण, जि. ठाणे)   येथे ६२ सदनिका, घणसोली- नवी मुंबई सेक्टर ११ येथे ४० सदनिका, घणसोली- नवी मुंबई सेक्टर ८ येथे ५१ सदनिका, मौजे वाळीव (ता. वसई, जि. पालघर) येथे ६८ सदनिका, कोपरी (ता. वसई, जि. पालघर) येथे २० सदनिका सोडतीत विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

कोकण मंडळाच्या सन २०२१ च्या सोडतीतील  इच्छुक अर्जदारांचे  अर्ज सादर करतेवेळी दि. ०१/०४/२०२० ते दि. ३१/०३/२०२१ या १२ महिन्यांच्या कालावधीतील सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न ग्राह्य धरले जाईल. त्यानुसार उपरोक्त कालावधीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी (EWS) अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न २५ हजार रुपये पर्यंत असावे. अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न २५,००१ हजार रुपये ते ५० हजार रुपयापर्यंत असावे तसेच मध्यम उत्पन्न गटासाठी (MIG) अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न ५०,००१ रुपये ते ७५ हजार रुपयापर्यंत असावे. उच्च उत्पन्न गटासाठी (HIG) अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न ७५ हजार रुपयांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.

त्याचबरोबर  अत्यल्प उत्पन्न गटातील अर्जदाराला अर्जासोबत ५ हजार रुपये इतकी अनामत रक्कम भरावयाची आहे. तसेच अल्प उत्पन्न गटाकरीता १० हजार रुपये, तर  मध्यम उत्पन्न गटातील अर्जदाराला १५ हजार रुपये व उच्च उत्पन्न गटातील अर्जदाराला अर्जासोबत २० हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. सोडतीनंतर यशस्वी अर्जदार वगळून इतर सर्व अर्जदारांच्या अनामत रकमेचा त्यांच्या खात्यामध्ये परतावा केला जाणार आहे. तसेच या सोडतीकरिता ५६० रुपये प्रति अर्ज शुल्क आकारण्यात येणार आहे.

कोकण मंडळाच्या सोडतीत सहभाग घेणाऱ्या इच्छूक अर्जदारांकरिता https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर सोडतीबाबत मार्गदर्शन करणारी माहिती पुस्तिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सर्व इच्छूक अर्जदारांनी  अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा करण्याआधी या माहिती पुस्तिकेचा अभ्यास करणे आवश्यक राहील.

सदनिकांच्या वितरणासाठी म्हाडाकडे पारदर्शक संगणकीय सोडतीची एकमेव प्रक्रिया आहे याव्यतिरिक्त म्हाडाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही. सोडत प्रक्रियेबाबत अथवा सदनिका मिळणेबाबत अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तींशी परस्पर व्यवहार करू नये, तसे केल्यास कोंकण मंडळ कोणत्याही व्यवहारास / फसवणूकीस जबाबदार राहणार नाही, असे आवाहन, कोंकण मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. नितीन महाजन यांनी केले आहे. सोडत प्रक्रियेमध्ये अर्जदारांना येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करण्याकरिता आणि संगणकीय सोडत प्रणालीच्या कामकाजावर देखरेख ठेवण्याकरिता सन २००९ पासून उच्च स्तरीय देखरेख समिती कार्यरत आहे. कोंकण मंडळाच्या २०२१ च्या सोडतीसाठी देखील त्रिसदस्यीय उच्च स्तरीय देखरेख समिती कार्यरत आहे, अशी माहिती श्री. महाजन यांनी दिली .

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर नागरिकांना हक्काच्या घराची शुभ बातमी मिळावी याअनुषंगाने सदनिकांच्या वितरणाकरिता प्राप्त अर्जाची संगणकीय सोडत १४ ऑक्टोबर, २०२१ रोजी ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये सकाळी १० वाजता काढण्यात येणार आहे.