रात्रीस खेळ चाले… संपेल ना कधीही हा खेळ राजकारण्यांचा!

Mid night Meetings | राज्याच्या राजकीय समीकरणात मध्यरात्रीच्या चर्चांना फार महत्त्वं आहे. युती-आघाडी करण्याच्या चर्चा असो, सरकार पाडण्याच्या चर्चा असो वा सत्तास्थापनेच्या चर्चांसाठी सर्वांनीच मध्यरात्रीचा मुहूर्त साधला आहे. त्यामुळे येत्या काळात अशाच मध्यरात्रीच्या चर्चा घडवत राज्याच्या राजकारणात आणखी काय बदल होतात हे पहावं लागणार आहे. 

मुंबई – वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काल मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मध्यरात्रीत झालेल्या बैठकीवरून वंचित आणि शिंदे गट यांच्यात युती होण्याचे संकेत आहेत. मात्र, प्रकाश आंबेडकरांनी याबाबत स्पष्ट नकार दिला आहे. परंतु, अशा महत्त्वाच्या चर्चांसाठी राजकीय मंडळी मध्यरात्रीचाच मुहूर्त साधत असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.

हेही वाचा – वंचितचे प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मध्यरात्री भेट; युती होणार का?

राज्यात नुकतंच शिवसेना फुटीचं प्रकरण गाजलं. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सारंकाही आलेबल सुरू असतानाच अचानक एकनाथ शिंदेंनी यु टर्न घेतला आणि भाजपासोबत सत्ता स्थापन केली. महाविकास आघाडी सरकार केव्हाही कोसळेल असा दावा वारंवार केला जात असतानाच शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर बसले. धक्कादायक म्हणजे, सत्तेवर असणाऱ्यांनीच सरकार पाडले आणि त्यांनीच पुन्हा सत्ता स्थापन केली. त्यामुळे या अनाकलनीय सत्तास्थापनेचा बेत नक्की कुठे आखण्यात आला? कसा आखण्यात आला याबाबतची माहिती अद्यापही गुलदस्त्यात आहे. परंतु, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वेष बदलून मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटत असत, असा मोठा गौप्यस्फोट अमृता फडणवीसांनी केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याला दुजोरा दिला होता. त्यामुळे या महाविकास आघाडी सरकार कोसळण्याचं आणि सत्तास्थापनेचं नियोजन मध्यरात्रीच्या बैठकीत पार पडलं, असं म्हणायला हरकत नाही.

हेही वाचा – देवेंद्र रात्री वेष बदलून एकनाथ शिंदेंना भेटायचे, अमृता फडणवीसांकडून गुप्तभेटीबाबत गौप्यस्फोट

२०१९ च्या विधानसभा निवडणुकांचा निकाल हाती आल्यानंतरही अशाच नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. शिवसेनेने भाजपासोबतची युती तोडल्यानंतर सत्तेसाठीची गणितं जुळवण्यात शिवसेना आणि इतर पक्ष व्यस्त असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी भल्या पहाटे शपथविधी उरकून घेतला. अर्थात या भल्या पहाटेच्या शपथविधीचा बेतही मध्यरात्रीच्या शांततेच आखण्यात आला होता, असे सांगितले जाते.

पहाटेचा शपथविधी आणि शिंदे-फडणवीस सरकार ही दोन्ही प्रकरणं राज्याच्या राजकीय इतिहासातील महत्त्वाच्या घटना आहेत. या दोन्ही घटनांची आखणी, नियोजन मध्यरात्रीच्या निरव शांततेत झाली. मात्र, मध्यरात्री खलबतं होण्याची ही दोनच प्रकरणं नाहीत. शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर त्याच मध्यरात्री राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकरही तिथे उपस्थित होते. पण ही भेट नेमकी कशासाठी झाली, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.

दरम्यान, ९ जुलै २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात तब्बल सहा तास बैठक झाली. मध्यरात्री अडीच वाजेपर्यंत या तिन्ही नेत्यांमध्ये महाराष्ट्राच्या राजकाणावरून प्रदीर्घ चर्चा झाली होती. ऑक्टोबर महिन्यात अंधेरी पोटनिवडणुकीचा मुद्दा गाजला. प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या लढाईसाठी शिंदे-फडणवीस सरकार आणि उद्धव ठाकरे गट आमने-सामने आले होते. तेव्हा भाजपा नेत्यांचंही १७ ऑक्टोबर २०२२ च्या मध्यरात्री रणनीती आखण्याचं काम सुरू होतं. तर, १५ नोव्हेंबर २०२२ च्या मध्यरात्रीही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात गुप्त बैठक झाली होती.

हेही वाचा – भाजपा अंधेरी पोटनिवडणूक लढवणार का? मध्यरात्री नेत्यांची खलबतं, बैठकीत काय ठरलं?

मध्यरात्रीच्या गाठीभेटी आताच्या नव्या नाहीत. युती सरकारच्या काळातही मध्यरात्रीची खलबतं होत होती. लोकसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरू असतानाच अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसला रामराम ठोकला होता. त्यांना लोकसभेसाठी उमेदवारी हवी होती. त्यावेळी त्यांनी ४ एप्रिल २०१९ च्या मध्यरात्री २ वाजता तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे ते भाजपात प्रवेश करणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. मात्र, त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. एवढंच नव्हे तर विधानसभा निवडणुकीच्या वेळीही उमेदवारीवरून रवींद्र गायकवाड नाराज होते. मात्र, उद्धव ठाकरेंनी समजूत काढल्यानंतर रवींद्र गायकवाड यांनी २६ मार्च २०१९ च्या मध्यरात्री तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती.

हेही वाचा – फडणवीसांनी मध्यरात्री घेतली शिंदेंची भेट, गुप्त बैठकीत काय ठरलं?

राज्याच्या राजकीय समीकरणात मध्यरात्रीच्या चर्चांना फार महत्त्वं आहे. युती-आघाडी करण्याच्या चर्चा असो, सरकार पाडण्याच्या चर्चा असो वा सत्तास्थापनेच्या चर्चांसाठी सर्वांनीच मध्यरात्रीचा मुहूर्त साधला आहे. त्यामुळे येत्या काळात अशाच मध्यरात्रीच्या चर्चा घडवत राज्याच्या राजकारणात आणखी काय बदल होतात हे पहावं लागणार आहे.