परप्रांतीय, गरजूंना रेशनवर गहू, तांदुळ, टोकन सिस्टिमचा होणार वापर

One Country, One Ration Card

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या आर्थिक सहायाअंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील गरीब व गरजू पात्र शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचा लाभ मिळावा यासाठी नुकतीच एक ऑनलाईन बैठक पार पडली. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यानुसार अन्नधान्य मिळण्यास पात्र असलेल्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थ्यांना एप्रिल आणि मे या दोन महिन्यापैकी एका महिन्याचे प्रति सदस्य ३ किलो गहू आणि १ किलो तांदूळ देण्यात येणार आहे. तर अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना प्रति शिधापत्रिका ३५ किलो धान्याचे मोफत वितरण करण्यात येत आहे. ज्यांची नोंद ऑनलाईन झाली नाही, अशा व्यक्तींचा समावेश करण्यात येणार आहे. परप्रांतीय मजुरांना तात्पुरती शिधापत्रिका तसेच ऑनलाईन टोकन देण्याचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील अंत्योदय योजना व प्राधान्य कुटूंब लाभार्थींना मे महिन्यासाठी प्रति व्यक्ती ५ किलो इतके अन्नधान्याचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. तसेच जूनमध्येही अशाच पद्धतीने अन्नधान्याचे वितरण करण्यात येईल. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील एकुण पात्र शिधापत्रिकांपैकी ९० टक्के शिधापत्रिकाधारक ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्याचा लाभ घेत आहेत. उर्वरीत १० टक्के पात्र शिधापत्रिकाधारकांचा शोध घेऊन त्यांना धान्याचा लाभ मिळण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना जनजागृती करण्याबाबत अवगत करण्यात आले आहे. पात्र शिधाधारक आहेत. पण ऑनलाईन डिजिटाईज झाले नाही, अशा शिधापत्रिकाधारकांना ऑनलाईन करून त्यांना लाभ देण्यात येणार आहे.

परप्रांतीयांना असे मिळणार तात्पुरते रेशन कार्ड

मुंबई ठाणे शिधावाटप क्षेत्रात रागणाऱ्या सर्व परप्रांतीय, इतर जिल्ह्यातील, स्थलांतरीत पात्र लाभार्थ्यांनी एक देश एक रेशनकार्ड योजनेअंतर्गत पोर्टेबिलीटी पर्यायाअंतर्गत नजीकच्या अधिकृत शिधावाटप दुकानातून अन्नधान्य प्राप्त करून घेता येणार आहे. मुंबई ठाणे शिधावाटप यंत्रणेतील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांना शासनाकडून देय असलेल्या अन्नधान्याच्या तपशीलाबाबत शासनाच्या http://mahaepos.gov.in या संकेतस्थळावरील RC details मध्ये जाऊन शिधापत्रिकांना त्यांचे शिधापत्रिकेकरिता देण्यात आलेल्या १२ अंकी SRC टाकून खातरजमा करता येईल.

टाटा सामाजिक संस्था यांनी काही भागांमध्ये पात्र लाभार्थ्यांना शिधा देण्यासाठी एक प्रायोगिक तत्वावर यंत्रणा विकसित केली आहे. त्यामध्ये अन्नधान्य, दर त्याचप्रमाणे अन्नधान्य मिळण्याबाबतची निश्चित वेळ SMS द्वारे कळणवण्याचा पर्याय आहे. या पर्यायामुळे गर्दी टाळता येणे शक्य आहे. त्यामुळेच इतर संस्थांनीही याच मॉडेलचा वापर करावा असे आवाहन शासनामार्फत करण्यात आले आहे.