गुजरात सीमावर्ती भागात तीनवेळा भूकंपाचे सौम्य धक्के

सुरगाणा : गुजरात सीमावर्ती भागात राशा, रघतविहीर, फणसपाडा येथे शनिवारी (दि.१८) व रविवारी (दि.१९) तीन वेळा भूकंपाचे सौम्य धक्के बसले. याप्रकरणी तहसीलदार सचिन मुळीक यांनी भेट देऊन नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे.

सुरगाणा तालुक्यातील सीमावर्ती भागातील रघतविहीर, फणसपाडा, राशा गावात शनिवारी (दि.१८) पहाटे २.30 वाजेदरम्यान अर्धा मिनिटभर भूकंपाचा धक्का बसला. दुसरा धक्का त्याच दिवशी दुपारी 1.52 वाजेदरम्यान बसल्याचे नागरिकांनी सांगितले. रविवारी (दि.१९) दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान फायर उडविल्या सारखा जोरात आवाज आला. यावेळी मांडणी वरील ठेवलेल्या भांड्याचा आवाज गावभर आल्याने नागरिकांमध्ये भूकंपाचे हादरे बसत असल्याचे गावात अशी उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. ाबाबत नेमके काय हा प्रकार आहे याबाबत शासनाने चौकशी करुन नेमके भूकंपाचे हादरे आहे की दुसरे काही याबाबतीत तपास यंत्रणा राबविण्यात यावी अशी मागणी फणसपाडा, रघतविहीर, राशा ग्रामस्थांनी केली.

घटनेची माहिती मिळताच तहसीलदार सचिन मुळीक यांनी राशा येथे भेट देऊन पाहणी करीत ग्रामस्थांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहन केले. यावेळी रघुनाथ जोपळे, शिवाजी गावित, पांडू बागुल, पांडू सालकर तलाठी चौधरी आदी उपस्थित होते. आवाज अनेकवेळा गुजरात मधील अंकलास, घोडमाळ, सिदुंबर,निरपन, दमणगंगा डॅम, वांसदा जवळील झुजू डॅम या भागात येत असतात. आवाजाची तीव्रता भूगर्भातून अधिक जाणवली. जमिनीतून आवाज आल्याचे जाणवते, असे नागरिकांनी सांगितले.