घरमहाराष्ट्रढोलताशा पिकअपला अपघात, १ ठार १२ जखमी

ढोलताशा पिकअपला अपघात, १ ठार १२ जखमी

Subscribe

पुणे विभागातील बातम्या वाचा एका क्लिकवर....

ढोलताशा घेऊन जाणारी पिकअप गाडी आणि दूध टँकर यांच्यात कल्याणनगर महामार्गावर आळेफाटाजवळ मोठा अपघात झाला असून त्यात ढोलताशा पथकाचा एक ठार तर १२ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. संजय रखमाजी त्रिभुवन (वय ५०) असे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. श्रीरामपुर (अहमदनगर) येथील पूनम ढोल पार्टीचे पथक मुंबई येथील गणेश उत्सव कार्यक्रमात वाजवून टेम्पोतून (क्रमांक एमएच १४, डीएम. २८२९) कल्याणनगर महामार्गाने परतत होते. तेव्हा आळेफाट्यापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या वडगाव आनंद परिसरात समोरून येणार्‍या दुधाच्या टँकर (एमएच १४ बीजे ६८९६ ) सोबत त्याचे समोरासमोर धडक झाली.

ढोल ताशा पथकातील शाहरूख रशिद शेख (वय २३), ख्वाजा रशिद शेख (वय २५), विशाल दिलीप थोरात (वय २२), सागर कचरू शेलार (वय २४), राजू संजय साबळे (वय १९), संजू पुजा भालेराव (वय ३१), किरण हनुमंत ननावरे (वय २८), उमेश चव्हाण (वय ३०), अजय धिवर (वय २६), सचिन बोरकर (वय २०), नरेंद्र चव्हाण (वय २७), विष्णू शेलार (वय ३०) (सर्व रा. श्रीरामपुर, जि. अहमदनगर) हे जखमी झाले. यातील गंभीर जखमी शेख बंधु आणि किरण ननावरे यांना पुढील उपचारासाठी संगमनेर व नगर येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान अपघातानंतर ग्रामस्थ व आळेफाटा पोलिसांनी जखमींना उपचारासाठी आळेफाटा येथील खाजगी रुग्नालयात दाखल केले. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

- Advertisement -

धमकी देऊन मागितली 70 हजारांची खंडणी

पुणे | सुपरव्हिजन करणार्‍या अधिकार्‍यास केबल रिपेअरिंगचे काम सुरु करण्यासाठी गणपतीच्या वर्गणी स्वरूपात खंडणी मागणार्‍यांपैकी एकाला अटक करण्यात आली आहे. ही घटना विश्रांतवाडी येथील सुयोग डायग्नोस्टीकजवळ घडली. गौरव उर्फ पिंट्या वहिले (27) आणि आणखी चार जणांनी ही खंडणी मागितली होती. गौरव व इतर चारजणांनी मिळून राहुल सणस यांच्या केबल रिपेअरिंगच्या कामात अडथळा निर्माण केला. तसेच या कामावर देखरेख करणार्‍या अधिकार्‍याकडे वर्गणीच्या रुपात ५० हजार रुपयांची खंडणी मागण्यात आली. इतर मंडळाच्या ७० हजार रुपयांच्या वर्गणीचीही मागणी त्या अधिकार्‍याकडे करण्यात आली. त्यानंतर त्या अधिकार्‍याने स्थानिक पोलीस ठाण्यात खंडणीविरोधात तक्रार केली. त्या तक्रारीवरून गौरव उर्फ पिंट्या वहिले याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच इतर चारजणांविरुद्धही गुन्हा नोंदवण्यात आला. या गुन्ह्यात गौरव उर्फ पिंट्या याला अटक करण्यात आली आहे. तर त्याचे चार साथीदार फरार आहेत.


विसर्जन मिरवणूक डॉल्बीवर बंदी

पुणे | गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत कोणत्याही मंडळास डी.जे. आणि डॉल्बी सिस्टीमचा वापर करता येणार नाही. तसेच मिरवणुकीत वाजवण्यात येणार्‍या साऊंड सिस्टीमसाठी संबंधित हद्दीतील पोलीस स्टेशनची परवानगी घेणे आवश्यक आहे, असे पत्रक पोलीस सहआयुक्त शिवाजी बोडखे यांनी काढले आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीच्या कर्कश: आवाजाऐवजी पारंपरिक ढोल-ताशांचा आवाज घुमणार आहे. औद्योगिक विभागात दिवसा 75 डेसीबल, तर रात्री 70 डेसीबल आवाज क्षमता निश्चित करण्यात आली आहे. वाणिज्य झोनमध्ये दिवसा 65 डेसीबल, तर रात्री 55 डेसीबल करण्यात आली आहे. तसेच शांतता झोनमध्ये दिवसा 50 डेसीबल, तर रात्री 40 डेसीबल निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे या व्यतिरिक्त कोणत्याही मंडळाने आवाजाची पातळी वाढविल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

- Advertisement -

हातभट्टीवर पोलिसांचा छापा; 11 लाखांचे साहित्य जप्त

daru-bhatti
प्रातिनिधिक चित्र

पुणे |  आळंदी हद्दीतील चिंबळी येथे गुन्हे शाखेने हातभट्टीवर छापा टाकून दारू बनविण्यासाठी लागणारे 60 हजार लिटर रसायण, 1190 लिटर हातभट्टी, 75 किलो तुरटी, 10 किलो गुळ, 35 मोकळे कॅन, दोन पाण्याच्या विद्युत मोटारी, 5 भट्टीला हवा मारण्याचे इलेक्ट्रीक भाते, लाकडी सरपण असे 11 लाखांचे साहित्य जप्त केले. ही कारवाई रात्री अकराच्या दरम्यान करण्यात आली. याप्रकरणी हातभटीचा मालक दयाराम चौधरी, सचिन तेली, संदीप अभंगकर या तिघांना अटक केले आहे. गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना चिंबळी फाटा येथून एका मारूती मोटारीतून हातभट्टी दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून आरोपी तेली व अभंगकर यांना ताब्यात घेतले. आरोपींकडे चौकशी केल्यानंतर चिंबळी येथील नदीकाठी असलेल्या दारूच्या भट्टीवरून दारू आणल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून कारवाई केली.


दहशतवादविरोधी जनजागृती अभियान

पुणे | संस्कार प्रतिष्ठान, टाटा व्हालेंटिअरिंग टाटा मोटर्स, चिंचवड पोलीस स्टेशन आणि डॉ. डी वाय पाटील फार्मास्युटीकल सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने दहशतवाद विरोधी जनजागृती अभियान चिंचवड येथे राबविण्यात आले. या अभियानांत चिंचवड गावातील चाफेकर चौक,केशवनगर,मिो्पटल ते पुन्हा चाफेकर चौक अशी फेरी काढुन नागरिकांनी गणेशोत्सवामध्ये गर्दीच्या ठिकाणी काय खबरदारी घ्यावी याविषयी जनजागृती करण्यात आली. यामध्ये बेवारस वस्तू,बेवारस वाहन, संशयीत व्यक्ती आढळून आल्यास स्थानिक पोलिसांना कळवावे स्वतः हात लावू नये, अशी माहिती देण्यात आली. या फेरीचे आयोजन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन,अप्पर पोलीस आयुक्त श्रीयुत मकरंद रानडे आणि पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाली चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे व संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ मोहन गायकवाड यांनी राबविले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -