पंढरपूरात लाखो भाविक दाखल; चंद्रभागेत स्नानासाठी हजारोंचा जनसागर

यंदाच्या आषाढ यात्रेत दाट संख्येने वारकरी उपस्थित होणार आहेत. सध्या संपूर्ण पंढरपूर नगरी विठ्ठलमय झाली असून भाविकांमध्ये विठूरायाच्या दर्शनाची आस लागली आहे

आषाढी एकादशीला आता फक्त एकच दिवस बाकी असून संपूर्ण पंढरपूरात आषाढीची लगबग सुरू झाली आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे सर्व धार्मिक स्थळांवर बंदी घालण्यात आली होती. दरम्यान यंदा कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्यामुळे पंढरपूरात आषाढी एकादशी साजरी केली जाणार आहे. तसेच पंढपूरातही पालख्यांचे आणि वारकऱ्यांचे स्वागत करण्यासाठी जय्यत तयारी झाली आहे. आज संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या पंढरपूरात दाखल होणार आहेत. कोरोनामुळे गेली २ वर्ष पंढरपूरात कोणताच उत्साह मोठ्या प्रमाणात साजरा केला नव्हता. त्यामुळे यंदाच्या आषाढ यात्रेत दाट संख्येने वारकरी उपस्थित होणार आहेत. सध्या संपूर्ण पंढरपूर नगरी विठ्ठलमय झाली असून भाविकांमध्ये विठूरायाच्या दर्शनाची आस लागली आहे.

आत्तापर्यंत पंढरपूरात जवळपास ७ लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल झाले आहेत, शिवाय उद्यापर्यंत पंढरपूरात आणखी भक्त दाखल होतील. यंदा निवासासाठी ५ लाखांपेक्षा जास्त भाविकांच्या राहण्याची सोय झाली असून भाविकांसाठी पिण्याचे आणि वापरायचे शुद्ध पाणी, स्वच्छतागृह, वीज, आरोग्य सेवा, पोलिसांची व्यवस्था यांची सुद्धा सोय करण्यात आली आहे.

चंद्रभागेत स्नानासाठी हजारोंचा जनसागर
दर्शनासाठी आलेले वारकरी विठूरायाच्या दर्शनाआधी पवित्र चंद्रभागेत स्नान करतात. सध्या लाखो भाविक पंढरपूरात दाखल झाले आहेत. चंद्रभागेत स्नानासाठी भाविकांची गर्दी झाली आहे. तसेच आता नदीची पाणी पातळी सुद्धा जास्त आहे.


हेही वाचा :आषाढी एकादशीसाठी वारकऱ्यांकडून पंढरपूरला येण्याची विनंती; उद्धव ठाकरे म्हणाले…