सभागृहात मंत्री गैरहजर… अजित पवार संतापले; विधानसभा अध्यक्षांनी दिले महत्त्वाचे निर्देश

Maharashtra Assembly Budget 2023 | सभागृहाच्या शिस्तीला धरुन हे योग्य नाही तरी संबंधितांना कडक शब्दात समज देण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली. 

ajit pawar

Maharashtra Assembly Budget 2023 | मुंबई – आपल्या मतदार संघातल्या विविध प्रश्नांची तयारी करुन सदस्य सभागृहात येत असतात. विविध संसदीय आयुधांचा वापर करुन ते आपले प्रश्न सभागृहात मांडत असतात. मात्र सरकारमधील मंत्री सदस्यांच्या प्रश्नांचा उत्तर द्यायला सभागृहात उपस्थित नसतात. त्यामुळे अनेक वेळा सभागृह तहकुब करण्याची वेळ येते ही गंभीर बाब आहे, हे वारंवार घडत आहे, या प्रकरणी संबंधितांना कडक शब्दात समज देण्यात यावी अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. यावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तीव्र नापसंती व्यक्त करत सरकारने याची गंभीर दखल घेण्याची सूचना सरकारला दिली.

हेही वाचा – करताना काही वाटलं नाही का? शीतल म्हात्रे व्हिडीओप्रकरणी शंभूराज देसाई संतापले

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, राज्यातील सर्वसामान्यांचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे तसेच आपल्या मतदार संघातील प्रश्न विविध संसदिय आयुधांचा वापर करुन सभागृहात आपले प्रश्न मांडत असतात. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी तसेच सरकारकडून याबाबत उत्तर देण्यासाठी विधानसभेत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात येते. मात्र सरकारमधील मंत्री याबाबत गंभीर नसतात. सदस्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला मंत्री सभागृहात उपस्थित नसतात. मंत्री उपस्थित नसल्याने सभागृह तहकुब करण्याची नामुष्की अनेक वेळा येते. सभागृहाच्या शिस्तीला धरुन हे योग्य नाही तरी संबंधितांना कडक शब्दात समज देण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली.

यावेळी निर्देश देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, आज सकाळी विशेष बैठकीत ९ सूचना दाखल झाल्या होत्या. त्यापैकी ४ सूचनांवर चर्चा झाली. १ लक्षवेधी दुसऱ्या खात्याकडे वर्ग करण्यात आली आहे. आता उरलेल्या ४ लक्षवेधी नियमित कामकाजात घेतली जाईल. तसंच, मंत्र्यांच्या अनुपस्थितीबाबत शासनाने गंभीर दखल घ्यावी. संबंधित मंत्र्यांना योग्य त्या सूचना केल्या जातील, असं आश्वासनही राहुल नार्वेकर यांनी दिलं.

हेही वाचा – ठाणे खाडीप्रश्नी सत्ताधाऱ्यांतच जुंपली, मंत्र्यांच्या उत्तरांवर आमदारांचा आक्षेप