मुंबईत अतिवृष्टी झाल्यास गुडघाभर पाणी साचेल – आदित्य ठाकरे

मुंबईत सध्या पावसाळ्यापूर्वी आवश्यक नद्या व नाले यांची सफाईकामे सुरू आहेत. आतापर्यंत ७८ टक्के नालेसफाई झाली आहे. तसेच पालिकेने आतापर्यंत केलेल्या विविध उपाययोजनांमुळे ९० टक्के फ्लडिंग स्पॉटवरील पाणी साचण्याचे प्रमाण कमी झाले आहे, असा दावाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला.

30 percent drain cleaning in Corona crisis

मुंबईत आतापर्यंत ७८ टक्के नालेसफाईची कामे झाली आहेत, मात्र मी खोटे बोलणार नाही. अतिवृष्टी, ढगफुटी झाल्यास व त्याचवेळी समुद्रात मोठी भरती असल्यास परिस्थिती हाताबाहेर जाते. सखल भागांत काही काळ गुडघाभर पाणी साचू शकते, अशी स्पष्ट कबुली राज्याचे पर्यटन, पर्यावरणमंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी दिली.

मुंबई महापालिका मुख्यालयात पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्यासोबत त्यांनी एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई व इतर कामांचा त्यांनी आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

मुंबईत सध्या पावसाळ्यापूर्वी आवश्यक नद्या व नाले यांची सफाईकामे सुरू आहेत. आतापर्यंत ७८ टक्के नालेसफाई झाली आहे. तसेच पालिकेने आतापर्यंत केलेल्या विविध उपाययोजनांमुळे ९० टक्के फ्लडिंग स्पॉटवरील पाणी साचण्याचे प्रमाण कमी झाले आहे, असा दावाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला. तसेच अतिवृष्टी, ढगफुटी झाली तर कोणाच्या हातात परिस्थिती राहत नाही, मात्र तरीदेखील सर्वोत्तम यंत्रणा मुंबई महापालिकेकडे आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी नालेसफाई कामांची प्रमुख जबाबदारी असलेले अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू व संबंधित पालिका अधिकारी उपस्थित होते.

इमारत पुनर्विकास आणि इतर कामांमुळे खड्डे

मुंबईत सध्या सीसी रोड बनवले जात आहेत. नवीन रस्त्यांवर खड्डे दिसणार नाहीत, मात्र जुन्या रस्त्यांच्या ठिकाणी इमारत पुनर्विकासाची कामे व इतर कामे यामुळे रस्त्यांवर खड्डे पडू शकतात, असे त्यांनी या समस्येवर बोलताना सांगितले.

दरडग्रस्त भागांसाठी ६२ कोटींचा निधी

डोंगराळ, दरडग्रस्त भागात दुर्घटना घडून जीवितहानी होऊ नये यासाठी ६२ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच दरडीच्या भागात राहणार्‍या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी ३० हजार पीएपीची व्यवस्था करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

फक्त 35 टक्केच नालेसफाई – अ‍ॅड. आशिष शेलार

मुंबईत ७८ टक्के नव्हे, तर फक्त ३५ टक्के नालेसफाई झाली आहे. पालिकेचा आकडा हा रतन खत्रीचा आकडा आहे. त्यामुळे पावसाळ्यात जर मुंबई तुंबली, तर त्यास शिवसेना, मंत्री आदित्य ठाकरे व काँग्रेसचे नेते नाना पटोले हे कारणीभूत असतील. तसेच २५ वर्षे पालिकेत सत्ता उपभोगल्यानंतरही जर पावसाळ्यात मुंबईकरांच्या सुरक्षिततेची हमी देऊ शकत नसाल, तर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईकरांची माफी मागावी, अशी मागणी भाजपचे आमदार व नेते अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केली आहे.