Homeमहाराष्ट्रChandrashekhar Bawankule : पालकमंत्रिपदाबाबत कोणताही तिढा नाही; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती

Chandrashekhar Bawankule : पालकमंत्रिपदाबाबत कोणताही तिढा नाही; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती

Subscribe

नागपूर : “महायुती सरकारमध्ये पालकमंत्रिपदाबाबत कोणताही तिढा नसून, उपमुख्यमंत्री अजित पवार हे परदेशात गेले होते, त्यामुळे चर्चा झाली नाही. पालकमंत्रिपदासंदर्भात पुढील दोन दिवसांत निर्णय होईल,” असा विश्वास महसूल मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी (6 जानेवारी) सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर सद्यस्थिती माध्यमांसमोर सांगितली. (Minister Chandrashekhar Bawankule on Gaurdian ministership in Maharashtra)

हेही वाचा : Baba Siddique Murder : मुंबईत दहशत कायम राहावी म्हणून…बाबा सिद्दिकींना मारण्याचे कारण आले समोर… 

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “विदर्भातील झुडपी जंगलाचा प्रश्न सांगण्यासाठी ही भेट होती. तरीही काही विषयांवर चर्चा झाली. विदर्भात 86 हजार हेक्टर झुडपी जंगल जमिनी आहेत. त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. काही झुडपी जंगल जमिनी विभागीय आयुक्तांकडून सोडवण्यासाठीचा अहवाल सादर झाला आहे. या झुडपी जंगल जमिनींवर काही लोकांची घरे आहेत. ती घरे कायदेशीर करून देण्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे, ही घरे कायदेशीर करण्यासंदर्भात लवकरच प्रक्रिया सुरू होणार आहे,” असे त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरेंवर टीका

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले आयुष्य छोट्या चहाच्या दुकानातून सुरू केले. मोठा संघर्ष करून ते पंतप्रधानपदापर्यंत पोहोचले आहेत. नरेंद्र मोदी यांच्या संपूर्ण आयुष्याचा अभ्यास केला, तर उद्धव ठाकरे हे मोदी यांच्याबरोबर टाचणी इतकीही बरोबरी करू शकत नाही. उद्धव ठाकरे यांना समजले पाहिजे, की नरेंद्र मोदीनी त्यांचे संपूर्ण आयुष्य 140 कोटी जनतेसाठी समर्पित केले आहे. त्यांचे समर्पण आणि त्याग हा सूर्यप्रकाशा इतका स्वच्छ आहे.” असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. “अतिविलासी उद्धव ठाकरे मातोश्री-2 मध्ये कसे राहतात? कसा अतिविलास करतात? अडीच वर्षे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कसा अतिविलास केला? हे सर्व त्यांच्या मुखपत्रात छापून आले असते तर बरे झाले असते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी अतिविलासावर बोलू नये.” अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. तसेच, “अरविंद केजरीवालांच्या शीशमहलला सपोर्ट करण्यासाठी उद्धव ठाकरे हे बोलत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीवर बोलण्याची उद्धव ठाकरे यांची लायकी नाही. त्यांनी आधी आत्मपरीक्षण केले पाहिजे आणि मग मोदींवर बोलले पाहिजे,” अशी टीका त्यांनी यावेळी केली.

बीड प्रकरणी आरोपींना शिक्षा होणारच

“आमदार सुरेश धस यांच्याशी माझे 2-3 वेळा बोलणे झाले आहे. सुरेश धस यांनी कोणतीही गोष्ट जाहीरपणे उघड करण्याऐवजी सरकारकडे मांडली पाहिजे. त्यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही चर्चा झाली. पुन्हा बोलणार आहेत. आपली जी भूमिका सरकारशी संबंधित असेल ती सरकारसमोर आणि पक्षाशी संबंधित जी भूमिका असेल, ती माझ्यासमोर मांडली पाहिजे. परंतु, बीड हत्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी सगळ्या प्रकारची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा होईल,” असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

संयुक्त समितीचा अहवाल लवकरच

वक्फ बोर्डाच्या कायद्यासंदर्भातील पुढील कृतीबाबत केंद्र सरकार विचार करत आहे. लोकसभेची संयुक्त समिती त्या संदर्भात गठित झाली आहे. वक्फ बोर्डाने हिंदू देवस्थानच्या बळजबरीने जप्त केलेल्या जमिनी, सर्वसामान्य जनतेच्या जमिनी किंवा कोणत्याही मालमत्ता ज्या वक्फ बोर्डाकडे चुकीच्या पद्धतीने गेल्या आहेत, त्या परत मिळाल्या पाहिजे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकार काम करत आहे, अशी माहिती बावनकुळे या वेळी दिली.