घरमहाराष्ट्रमंत्री राजे आत्राम दाखवा आणि बक्षीस मिळवा!

मंत्री राजे आत्राम दाखवा आणि बक्षीस मिळवा!

Subscribe

राज्याचे वन आणि आदिवासी कल्याण राज्यमंत्री राजे अंबरिश आत्राम यांचे नाव अनुपस्थितीच्या यादीत सर्वात वर असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकार्‍याने आपलं महानगरला दिली.

नागपूर येथे सुरू असलेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्यभरातील आमदार त्यांच्या त्यांच्या मतदार संघातील जनतेचे प्रश्न घेऊन येत असतात. जनतेच्या प्रश्नांना थेट न्याय मिळेल, असे विधीमंडळ हे एकमेव व्यासपीठ. मात्र आमदार जेव्हा जनतेचे प्रश्न मांडतात, तेव्हा त्या प्रश्नासंबंधी असलेल्या खात्याचा मंत्री अनुपस्थितीत असणे हे सध्या नित्याचेच झाले आहे. सभागृहात वारंवार गैरहजर राहून राज्याचे वन आणि आदिवासी कल्याण राज्यमंत्री राजे अंबरीश आत्राम यांनी तर रेकॉर्डच केला आहे.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 4 जुलैपासून नागपूरमध्ये सुरू आहे. हे अधिवेशन म्हणजे सत्ताधारी पक्षाची सत्वपरीक्षा समजली जाते. मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे, अनेक घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर या परिक्षेत उत्तीर्ण व्हावे म्हणून सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी सभागृहात उपस्थित राहिले पाहिजे, असे आदेश फडणवीस सरकारने काढले आहेत. विशेषत: भाजपने यासाठी अनेकदा लेखी सूचना आमदारांना दिल्या. हे आदेश अर्थातच मंत्र्यांनाही आहेत. किती मंत्री या आदेशाचे पालन करतात, हा प्रश्न वेगळा. अनेक मंत्री नागपुरात येतात पण कामकाजात कितीजण असतात, हाही प्रश्न अनेकांना पडलेला आहे. नागपुरात येणार्‍या मंत्र्यांनी सुटीच्या दिवशी विभागीय बैठकांमध्ये सहभाग घेतला पाहिजे, अशी अपेक्षा असते. पण एकही मंत्री आणि आमदार रविवार किंवा सुट्टी नसलेल्या शनिवारीही नागपुरात थांबत नाही.

- Advertisement -

सध्या सुरु असलेल्या विधिमंडळाच्या कामकाजात कॅबिनेट मंत्री आहेत किंवा नाहीत, याची माहिती रोज संसदीय कार्यमंत्रालयाकडे नोंदवली जाते. या मंत्र्यांची नोंद होते खरी. पण त्यापैकी दिवसातील किती वेळ ते सदनात देतात हे ते खाते सांगू शकत नाही. राज्यमंत्री तर कॅबिनेट मंत्र्यांहून अनुपस्थितीच्या बाबतीत एक हात पुढे आहेत. त्यांच्या उपस्थितीची नोंद तशी कुठेच होत नाही. संसदीय कार्यमंत्रालयात तशी कोणतीच तरतूद नाही. यामुळे किती राज्यमंत्री सदनात आणि विधानमंडळात असतात याबाबत संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांच्या खात्यातल्या कुणीच काही सांगू शकत नाही.

राज्याचे वन आणि आदिवासी कल्याण राज्यमंत्री राजे अंबरिश आत्राम यांचे नाव अनुपस्थितीच्या यादीत सर्वात वर असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकार्‍याने आपलं महानगरला दिली. यासंदर्भात,अंबरिश राजे यांच्याशी संपर्क साधला असता नेहमीप्रमाणे त्यांनी फोन घेतला नाही.तसेच मेसेजलाही उत्तर दिले नाही.शेवटी त्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता, राजे हे अधिवेशनाला उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतात तसेच नागभवन येथे मंत्री निवासस्थानी हजर असतात.4 जुलैपासून अधिवेशन सुरू झाल्यानंतर ते किती दिवस हजर होते, असे विचारले असता अचूक हजेरी त्यांना सांगता आली नाही.राजे काही दिवस आजारी होते.ते आज कुठे आहेत असे विचारले असता,ते एका घरगुती कार्यक्रमाला गेले आहेत असे सांगण्यात आले. तसेच विधानसभा आणि विधानपरिषदेच्या कामकाजात मंत्रीमहोदय भाग घेतात तसेच नागभवन येथील कार्यालयात रात्री २ वाजेपर्यंत कामाचा निपटारा करतात असा दावाही राजे यांच्या कार्यालयाकडून करण्यात आला.

- Advertisement -

राजेंची बेजबाबदार वृत्ती

राजे हे मंत्री झाल्यावरही राजेगिरीतून बाहेर आलेले दिसत नाहीत. घरी ते दुपारशिवाय उठत नाहीत. ते गडचिरोलीत राहतात. या जिल्ह्याचे त्यांच्याकडे पालकत्व आहे. या पालकत्वामुळे अनेक बैठका घ्याव्या लागतात. पण पालकमंत्री नसल्यामुळे त्यातल्या अनेक बैठका या खूपदा पुढे ढकलाव्या लागतात वा रद्द तरी कराव्या लागतात. नियोजन मंडळाच्या बैठकीचेही असेच होते. जिल्ह्यातला हा सिलसिला राजेंनी नागपूरमध्ये सुरू असलेल्या अधिवेशनातही सुरू ठेवला आहे. अधिवेशन सुरू झाल्यापासून ते कोणाच्याही नजरेला लागलेले नाहीत.

सरकारने बक्षीस योजना राबवावी!

गडचिरोलीसारख्या सर्वाधिक आदिवासी संख्या असलेल्या जिल्ह्यातील मंत्र्याला खरेतर आदिवासींच्या कल्याणकारी योजना राबवता आल्या असत्या. पण ते करण्यात स्वत: राजेच गंभीर नाहीत, सरकारही गंभीर नाही. खरे तर अशा अनुपस्थित राहणार्‍या मंत्र्यांकरिता फडणवीस सरकारने विशेष प्रोत्साहन योजना राबवून त्यांच्या हजेरीसाठी बक्षीस ठेवले पाहिजे. – राधाकृष्ण विखेपाटील, विरोधी पक्षनेते, विधानसभा

 

मुख्यमंत्री फडणवीस, संसदीय कार्यमंत्री गिरीष बापटांनी राजेंची घेतली हजेरी

गेल्या बुधवारी वन आणि आदिवासी कल्याण विभागाच्या मागण्यांवर विधानसभेत चर्चा होती. यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि आदिवासी मंत्री विष्णू सावरा हे नियोजित कार्यक्रम, बैठकांमुळे सभागृहात उपस्थित राहणार नव्हते. ही दोन्ही खाती राज्यमंत्री म्हणून आत्राम यांच्याकडे आहेत. पण ते अधिवेशनात येत नसल्याचे लक्षात येताच संसदीय कार्यमंत्रालयाची झोपच उडाली. अखेर या खात्याचे मंत्री गिरीष बापट यांनी दम भरत राजेंना हजर राहण्याचे फर्मान काढले तेव्हा ते उपस्थित राहिले. याचदिवशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना दुपारी फोन केला तेव्हा राजेंनी त्याला काहीच प्रतिसाद दिला नाही. कारण त्यांनी सवयीनुसार फोन घेतलाच नाही. जेव्हा राजेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मिस्ड कॉल पाहिला तेव्हा ते गोंधळले. मुख्यमंत्र्यांना फोन केला तेव्हा फडणवीस यांनी राजेंची चांगलीच हजेरी घेतली.

 

Pravin Puro
Pravin Purohttps://www.mymahanagar.com/author/ppravin/
विविध वृत्तपत्रांमध्ये ३२ वर्ष पत्रकारिता. वृत्तपत्र आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, राज्य आणि राष्ट्रीय विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -