वन पर्यटनाला चालना देण्यासाठी आदित्य ठाकरेंचा मास्टर प्लॅन

aditya thackeray forest tourisam

राज्यातील वन पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन विकास महामंडळ आणि वन विकास महामंडळ यांची एक संयुक्त समिती गठीत करण्यात यावी. जंगलांचे नियमानुसार रक्षण करण्याबरोबरच जंगल परिसरात पर्यटन विकास करणे आणि त्या माध्यमातून रोजगारामध्ये वाढ करणे यासाठी या समितीने उपाययोजना सुचवाव्यात, अशा सूचना पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज या विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे याबाबत बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.

आदित्य ठाकरे म्हणाले की, वनसंवर्धन करण्याबरोबरच त्या भागात नवनवीन संकल्पना राबवून पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. राज्यातील राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये, व्याघ्र प्रकल्प यांचे संवर्धन आणि त्या भागातील पर्यटन विकास यासाठी वन विभाग आणि पर्यटन विभाग यांनी एकत्रीत काम करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

अस्तित्वात असलेल्या पर्यटनस्थळांचे संपूर्ण सक्षमीकरण करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात यावे. या पर्यटनस्थळांना चांगली रस्तेजोडणी आवश्यक आहे. याशिवाय शौचालये, पाणी आदी मुलभूत सुविधांची उपलब्धता महत्वाची आहे. पर्यावरणस्नेही पर्यटनाला चालना देण्यात यावी. याशिवाय राज्यातील व्याघ्र प्रकल्पाबरोबरच नागझिरासारखी विविध पक्षी अभयारण्ये, इतर जंगले यांच्या पर्यटन विकासालाही चालना देण्यात यावी, अशा सूचनाही मंत्री ठाकरे यांनी यावेळी दिल्या.

यावेळी पर्यटन विभागाच्या विविध मुद्यांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी मुंबई महापालिका आयुक्त प्रविण परदेशी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पर्यटन विभागाच्या सचिव विनिता सिंघल, वन विभागाचे सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी यांच्यासह व्याघ्र प्रकल्पाचे नितीन काकोडकर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे अन्वर अहमद आदी संबंधीत वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.