अमरावतीत पुढील ७ दिवस लॉकडाऊन घोषित, पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची घोषणा

हा लॉकडाऊन उध्या संध्याकाळी ८ वाजल्यापासून ७ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे.

अनलॉकनंतर अमरावतीमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात आज रविवारी कडकडीत बंद ठेवण्यात आला होता. तसेच मंत्री यशोमती ठाकूर यांनी स्वतः पाहणी केली होती. अमरावतीमध्ये कोरोना संसर्ग पुन्हा वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अमरावतीत केलेल्या लॉकडाऊनचा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी स्वतः पाहणी केली. यावेळी त्यांनी पोलिसांशीही संवाद साधला आणि कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले. आज मंत्री यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत १ आठवड्याचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. राज्यात अनलॉकनंतर प्रथमच अमरावतीमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे.

पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या समवेत जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीची आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे की, स्वतःची काळजी स्वतः घेण्याची गरज आहे. मास्क वापरण्याची गरज आहे. वारंवार हात धुण्याची, सामाजिक अंतराचे पालन करण्याचीही गरज आहे. जर आंदोलने आणि राजकीय सभा केल्यास तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. आम्ही नगरसेवकांना विनंतीही केली आहे की कोरोना संकट दूर करण्यासाठी प्रयत्न करा. असे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.

पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी पुढे म्हटले आहे की, अमरावाती नगरपालिका, अचलपूर नगरपालिका आणि जिल्ह्यातील इतर नगरपालिकांना कडक कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्यात करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकारी संध्याकाळपर्यंत जारी करतील. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याची गरज त्यासाठी ७ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यात १.६ चा डेथरेट आहे. त्यामुळे नाईलाजाने लॉकडाऊन करण्यात येत आहे. परंतु नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी जीवनाश्यक गोष्टी आणि एमआयडीसी हे आपण सुरु ठेवतो आहे.

अमरावती, अचलपूर कंटेनमेंट म्हणून घोषित करण्यात आले आहेत. तसेच लॉकडाऊनही करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन उध्या संध्याकाळी ८ वाजल्यापासून ७ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. आठवडा बाजारासाठीही सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी काही वेळातच पत्रक प्रसिद्ध करतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात एकूण १६०० बेडची तयारी ठेवण्यात आली आहे. नागरिकांना कामे आटोपण्यासाठी तसेच ऐनवेळी गैरसोय होऊ नये यासाठी उद्या ८ पर्यंत वेळ देण्यात आला आहे. असे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.